नवी मुंबई – केंद्र सरकारच्या विविध विभागांतील देशभरातील सुमारे सात हजार अधिकारी हिंदी राजभाषेच्या वापराला चालना देण्यासाठी सोमवार (ता. १४) आणि मंगळवारी (ता. १५) नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात एकत्र येणार आहेत. हिंदी दिवस २०२६ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन या ठिकाणी होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या यांनी रविवारी बेलापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या सभागृहात पत्रकार परिषदेत संमेलनाची माहिती दिली. यावेळी विभागाच्या स्मिता शर्मा, व्ही. एन. कान्ताराव आणि डॉ. निधी पाण्डेय, राज्य माहिती अधिकारी मनोज सानप हे उपस्थित होते. देशभरातून सुमारे सात हजार अधिकारी, राजभाषा कर्मचारी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या दोन दिवसीय संमेलनात सहभागी होणार असल्याचे सचिव आर्या यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी ११ ते दुपारी दिड या वेळेत उद्घाटन सत्र होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, खा. नरेश म्हस्के आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनात हिंदी राजभाषा, जनभाषा आणि संपर्कभाषा म्हणून विकसित करण्यासह भारतीय भाषांशी समन्वय, अनुवाद, साहित्य आणि तंत्रज्ञानातील भाषेचा वापर यावर विविध सत्रांत चर्चा होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हिंदी शब्दकोष, ‘भारती’ अनुवाद तंत्रज्ञानावरील मोबाईल अॅप आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या भाषा डेटा सेंटरचे लोकार्पण होणार आहे. ‘भारती’ अॅपच्या माध्यमातून विविध भाषांमधील मजकुराचे जलद भाषांतर करता येणार आहे. इंटरनेटचा वेग आणि भाषांतराची उपलब्धता लक्षात घेऊन पुण्यात राज्यातील पहिले भाषा डेटा सेंटर उभारण्यात आले आहे.
संमेलनात ‘वन्दे मातरम् आणि राष्ट्रीय चेतनेची अभिव्यक्ती’, ‘हिंदीतील करिअर : नव्या संधी’, ‘भारतीय भाषा आणि राजभाषा हिंदी : सहअस्तित्व आणि सौहार्द’, तसेच ‘मराठी आणि हिंदीचा परस्पर संबंध’ या विषयांवर विचारमंथन होणार आहे. गायक हरिहरन, पत्रकार व कथाकार नीलेश मिश्रा, ‘वन्दे मातरम्’चे संशोधक मिलिंद प्रभाकर सबनीस आणि लेखक जॉयदीप चट्टोपाध्याय यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे कार्यक्रमही संमेलनात होणार असल्याचे सचिव आर्या यांनी सांगीतले. तसेच गणेशोत्सवाची छटा असलेले सांस्कृतिक सादरीकरण, राज्यातील विकास प्रकल्पांचे सादरीकरण तसेच पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ‘भारतीय ज्ञानतंत्र – स्रोत, स्वरूप’, शिवशंकराच्या विविध रूपांची आणि ज्योतिर्लिंगांची माहिती देणारे पुस्तक तसेच कैद्यांनी लिहिलेले ‘अंधेरे से उजालों तक’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
हिंदीसोबत सर्व भारतीय भाषांना पुढे नेण्याचे धोरण राजभाषा विभागाने स्वीकारले आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना होणारा पत्रव्यवहार संबंधित राज्याच्या प्रथम अधिकृत भाषेत करण्याच्या पद्धतीचा उल्लेख करून हिंदी ही विविध भारतीय भाषांमधील संवादाची सेतूभाषा असल्याचे सचिव आर्या यांनी स्पष्ट केले.संमेलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सिडको प्रदर्शन केंद्रात योग प्रशिक्षण सुरू झाले असून सोमवारी आयुष मंत्रालयाच्या वतीने सुमारे ७०० जणांसाठी योग प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे विविध राज्यांमध्ये हिंदी तसेच भारतीय अन्य भाषांच्या संवादाला नवी दिशा मिळेल असेही त्या म्हणाल्या.
