नवी मुंबई : पंचायत समिती निवडणुकीत प्रत्येक पक्ष प्रचारात गुंतलेला असताना पनवेलमध्ये मात्र पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध आता पंचायत समिती निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर उफाळून आले असून, आमदार प्रशांत ठाकूर यांनी विक्रांत पाटील यांच्यावर आरोप करत त्यांना थेट इशारा दिला आहे. विशेष म्हणजे दोन्ही आमदार भाजपचेच असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आमदार विक्रांत पाटील यांनी विकास निधीचे वाटप करताना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे म्हणत, विकास निधी वाटप करताना शेकापच्या कार्यकर्त्यांना सोबत घेतल्याचा आरोप केला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये याबद्दल नाराजी असून वारंवार सूचना देऊनही आ. विक्रांत पाटील त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेरी आम्ही प्रदेश अध्यक्षांना याबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.

“जाहीरपणे भूमिका घेऊन पक्षाला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आतापर्यंत शांत राहिलो. पण, त्यांनाच परवा नसेल तर आम्हीही उत्तर देऊ. ठोशाला ठोसा देण्याची वेळ आली तर त्यालाही आमची तयारी आहे,” या शब्दांत आमदार प्रशांत थकरून यांनी आपल्या भावना व्यक्त करत विक्रांत पाटील यांना इशारा दिला. यासंदर्भात आमदार विक्रांत पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ न शकला नाही.