नवी मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारात हापूस आंब्याची यंदाच्या हंगामातील विक्रमी आवक नोंदवण्यात आली आहे. शनिवारी (ता. १८) एकाच दिवशी तब्बल ९४ हजार ६ पेट्यांची आवक झाली असून, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठी उलाढाल अपेक्षित आहे.
या आवकेत महाराष्ट्रातील कोकण पट्ट्याचा मोठा वाटा असून ५८ हजार ८९४ पेट्या रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग या भागांतून दाखल झाल्या आहेत. तर इतर राज्यांतून ३५ हजार ११२ पेट्यांची आवक झाली आहे. यंदा कोकणात अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि कीडरोगांचा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला आवक मर्यादित राहून दर उच्च पातळीवर होते.
मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आवक वाढू लागली असून, अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ती उच्चांकावर पोहोचली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला ४० ते ५० हजार पेट्यांपर्यंत असलेली आंब्याची आवक शनिवारी जवळपास दुपटीने वाढली. या वाढलेल्या पुरवठ्याचा परिणाम दरांवर झाला असून, घाऊक बाजारात हापूस आंब्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. सध्या दर्जानुसार प्रति पेटी (५ डझन) सुमारे १५०० ते ४००० रुपये दर मिळत आहेत.
सणानिमित्त भेटवस्तू म्हणून हापूसची मागणी कायम असल्याने उच्च प्रतीच्या आंब्यांना तुलनेने चांगले दर मिळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, एप्रिल-मे हा हापूसचा मुख्य हंगाम असल्याने पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारात खरेदीचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक आणि मागणी यामधील संतुलन लक्षात घेता दरात आणखी काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकतो, असे मत मुंबई एपीएमसीतील आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केले आहे.
अक्षय्य तृतीयेचा आंब्याशी असलेला खास संबंध
अक्षय्य तृतीया हा सण हिंदू परंपरेत अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतीही नवी खरेदी, गुंतवणूक किंवा शुभकार्य केल्यास त्यात सातत्याने वाढ होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच या दिवशी सोने-चांदीप्रमाणेच हंगामी फळांनाही विशेष महत्त्व असते.
हापूस आंबा हा उन्हाळ्यातील प्रमुख आणि प्रतिष्ठेचे फळ मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या सुमारास त्याचा हंगाम बहरात येत असल्याने या दिवशी आंब्याची खरेदी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. कुटुंबीयांना, नातेवाईकांना किंवा व्यावसायिक संपर्कांना भेटवस्तू म्हणून हापूस देण्याची परंपराही रूढ झाली आहे.
याशिवाय आंबा हे समृद्धी, गोडवा आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंब्याची खरेदी व सेवन केल्यास वर्षभर सुख-समृद्धी लाभते, अशी लोकांची धारणा आहे. म्हणूनच या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात हापूस आंब्याला विशेष मागणी दिसून येते.
