शनिवारपासून पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा ; देहरंग धरणाने तळ गाठल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय

अपुऱ्या पाण्यामुळे पनवेलकर अनेक महिन्यांपासून आठवडय़ातून एक दिवस कोरडा पाळत आहेत.

water
प्रतिनिधिक छायाचित्र

पनवेल : शहरासाठी बांधलेल्या देहरंग धरणाने तळ गाठल्याने पनवेल पालिका प्रशासनाने जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे गुरुवारी जाहीर केले. अपुऱ्या पाण्यामुळे पनवेलकर अनेक महिन्यांपासून आठवडय़ातून एक दिवस कोरडा पाळत आहेत.

पाच वर्षांपूर्वी पनवेल नगर परिषदेचा विस्तार महापालिकेत करण्यात आला. मात्र, पाण्यासारखी मूलभूत सुविधा अद्याप पालिका प्रशासन देऊ शकली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पाच वर्षांनंतरही पनवेल पालिकेच्या हक्काच्या धरणक्षेत्रातून गाळ काढण्यावर कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही. तसेच धरणाची उंची वाढविण्यासाठी गतिमान पद्धतीने प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केल्याचे दिसले नाही. उलट त्याहून अधिक गती रस्त्याची कामे, गटारे स्वच्छ करणे, रस्त्यांच्या दुरुस्तीवर डांबर टाकणे, प्रशासकीय इमारत व महापौर निवास बांधण्यासाठी प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळाले.

पनवेल शहर परिसरात असणाऱ्या सर्व तलावांमधील पाणी शुद्धीकरण करून त्याचा वापर उद्यान व स्वच्छतेसाठी पालिका करू शकली असती, मात्र त्यावर काम करण्याची मानसिकता पालिकेची नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सध्या पनवेल शहराला २८ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून यामध्ये धरण क्षेत्रापेक्षा अधिक पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उसनवारी करून पनवेलकरांची तहान भागविली जाते. दरवर्षी मे महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यापासून आठवडय़ातील एक दिवस पाणी न देणे हेच नियोजन पनवेलकरांसाठी असेल त्या व्यतिरिक्त मार्ग पालिका शोधणार नसेल तर पनवेलकरांची पाण्याची स्थिती यापुढे अजूनही दयनीय होणार आहे. जलस्रोतामध्ये वाढ होत नसली तरी पनवेल शहरालगत नवीन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रमाण वाढत आहे. हीच स्थिती अशीच असल्यास सिडको वसाहतींप्रमाणे सत्ताधारी भाजपला काही वर्षांनी पनवेलमध्ये पाण्यासाठी नवीन इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र देऊ नका, यासाठी आंदोलन करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

सात वेगवेगळय़ा जलकुंभांतून पाणीपुरवठा

पाणीपुरवठा दिवसाआड होणार असल्याने पालिकेने दोन वेगवेगळे क्षेत्र जाहीर केले आहेत. सात जलकुंभांतून हा पाणीपुरवठा होत आहे. पटेल मोहल्ला, नवीन सव्‍‌र्हिस हौद, गंगाराम टॉकिज, मार्केट यार्ड, जुने सव्‍‌र्हिस हौद, हरिओम नगर ठाणा नाका, भाजी मार्केट येथील सात वेगवेगळय़ा जलकुंभांतून दिवसाआड पनवेलकरांना पाणीपुरवठा होणार असल्याचे शहर अभियंता संजय जगताप यांनी कळविले आहे.

औद्योगिक वसाहतींचा पाणीपुरवठा आज बंद

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतींचा पाणीपुरवठा २७ मे दुपारी १२ ते शनिवार २८ मे दुपारी १२ असा चोवीस तास बंद राहणार आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल-दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे.

पाणी बंदमुळे नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी परिसरातील सर्व औद्योगिक वसाहतींना पाणी  पुरवठा होणार नाही. याशिवाय नवी मुंबईतील कोपरखैरणे, दिघा, ऐरोली, घणसोली या सर्व गावठाण परिसरात तसेच औद्योगिक वसाहतीतील रबाळे ते तुर्भे झोपडपट्टी भागातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alternate days water supply in panvel city from saturday zws

Next Story
फ्लेमिंगोंचा मुक्काम वाढल्याने छोटय़ा मासळीची टंचाई ; किनाऱ्यावर सहज सापडणारी मासळी मिळत नसल्याने मच्छीमार अडचणीत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी