नवी मुंबई : सुशासन, प्रशासकीय कार्यक्षमता आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रांत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऐरोलीत नवी संधी उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या तर्फे ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘पी.जी. डिप्लोमा इन गव्हर्नन्स’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ८ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या अभ्यास मंडळाने केलेल्या शिफारशींना संबंधित शैक्षणिक आणि व्यवस्थापन प्राधिकरणांची मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.

प्रशासन, सुशासन आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रांतील ज्ञान व कौशल्ये विकसित करणे हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसह या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, कार्यक्षमता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्यावर या अभ्यासक्रमात भर अपेक्षित आहे.

ऐरोली सेक्टर १५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक उपक्रम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रसाराचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या स्मारकाच्या माध्यमातून आता प्रशासनविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होत असल्याने स्मारकाच्या शैक्षणिक कार्याची व्याप्ती वाढणार आहे.

महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या उपक्रमामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील स्मारकाचे योगदान अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती

अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता, प्रवेश क्षमता, परीक्षा योजना, उत्तीर्णतेचे निकष आणि श्रेयांक रचना यांसंबंधीचे नियम मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमासंबंधी अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या संकेतस्थळाला भेट देता येईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि उपआयुक्त तथा स्मारकाच्या नियंत्रण विभागप्रमुख संघरत्ना खिल्लारे यांनी दिली.