नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरील खड्ड्यांच्या संदर्भात केलेल्या ‘ट्रायल अँड एरर’च्या वक्तव्याचा समाचार घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सोमवारी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “जनतेच्या जीवाशी ‘ट्रायल अँड एरर’ करता येणार नाही. उद्या एखादा पूल कोसळला, तर त्यालाही ट्रायल अँड एरर म्हणणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील दुर्घटनांवर सरकारने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दोन ठिकाणी खड्डे पडल्याच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (४ जुलै) प्रतिक्रिया देताना, “पहिल्या पावसानंतर अशा प्रकल्पांची चाचणी होते. त्यावेळी काही त्रुटी समोर येतात आणि त्या दुरुस्त केल्या जातात,” असे सांगत हा प्रकार ‘ट्रायल अँड एरर’चा भाग असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ मार्गावर दरड कोसळून काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली. या पार्श्वभूमीवर नेरूळ येथे विद्युत धक्का लागून जखमी झालेल्या दोन मुलींची वाशीतील फोर्टिस रुग्णालयात भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला.
“मोठे पायाभूत प्रकल्प उभारताना जनतेच्या सुरक्षिततेशी तडजोड होता कामा नये. पहिल्याच पावसानंतर समस्या समोर येत असतील, तर त्याला ‘ट्रायल अँड एरर’ म्हणणे योग्य नाही,” असे अमित ठाकरे म्हणाले. “उद्या एखादा पूल कोसळला, तर त्यालाही ट्रायल अँड एरर म्हणणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील अलीकडील दुर्घटनांचाही उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांपेक्षा नीचपणा दुसरा असू शकत नाही. सर्वाधिक आमदार, नगरसेवक आणि सत्ता तुमच्याकडे असताना जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, नेरूळ येथे विद्युत धक्का लागून जखमी झालेल्या दोन मुलींची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याची माहिती देत, “मनसे संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते आम्ही करू,” अशी ग्वाही अमित ठाकरे यांनी यावेळी दिली.
‘ऑपरेशन टायगर’मध्ये सरकार व्यस्त; जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत अमित ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “राज्यात लोकांचे जीव जात आहेत, दुर्घटना घडत आहेत; मात्र सत्ताधारी आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणात व्यस्त आहेत. जनतेच्या प्रश्नांऐवजी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. “लोक मरत असताना फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. ही लाजिरवाणी बाब आहे. सरकारने राजकीय खेळी थांबवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
‘नाशिकमध्ये करून दाखवलं’; मनसेच्या कारभाराचा दाखला
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना विकासकामे प्रभावीपणे झाल्याचा दावा अमित ठाकरे यांनी केला. “जिथे राज ठाकरे यांना संधी मिळाली, त्या नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. शहर तुंबले नाही, रस्त्यांवरील खड्डे आणि नागरी सुविधांचे प्रश्न निर्माण झाले नाहीत. आज सत्ता असलेले लोक वेळ मागत आहेत; मात्र अनेक वर्षे सत्ता त्यांच्याकडेच होती. त्या काळात त्यांनी काय केले, याचे उत्तर जनतेला द्यावे,” अशी टीका त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर केली.
