नवी मुंबई : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविल्याच्या प्रकरणावरून मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. नवी मुंबईनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी अमित ठाकरे यांच्यावर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल झाल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्याकडून करण्यात आला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘हा कसला न्याय?’ असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरे गेले असताना कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी हे छायाचित्र हटविल्याचे समोर आले. या घटनेवरून पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून मनसेने भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला आहे.
या संदर्भात बोलताना काळे यांनी भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचा दाखला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याचा प्रकाशन सोहळा भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही, असा दावा त्यांनी केला.
भंडारा येथील घटनेचाही काळे यांनी उल्लेख केला. निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजपचा स्कार्फ घातल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकाराबाबतही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला.
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्याचाही काळे यांनी संदर्भ दिला. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत,’ असे कोश्यारी यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असे काळे यांनी म्हटले.
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. ते छायाचित्र काढले म्हणून अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. मात्र, इतर घटनांमध्ये कारवाई होत नाही. महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि शिवभक्तांना माझा सवाल आहे, हा कसला न्याय?’ असा सवाल काळे यांनी उपस्थित केला.
नवी मुंबईतील प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. पुण्यातील प्रकरण हे त्यांच्याविरोधातील दुसरे प्रकरण असल्याचे सांगत, ‘अमित ठाकरे हे तमाम महाराष्ट्र आणि शिवभक्तांसाठी अभिमान आहेत,’ अशी भूमिका मनसेने मांडली. पुण्यातील या कारवाईमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
अमित ठाकरे यांच्यावरील गुन्ह्याच्या निमित्ताने मनसेने भाजप आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका बाजूला महाराजांच्या नावाचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप आणि दुसऱ्या बाजूला महाराजांच्या सन्मानासाठी घेतलेल्या भूमिकेवर कारवाई होत असल्याचा मनसेचा दावा, यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
