नवी मुंबई : आझादी का अमृत महोत्सवनिमित्ताने नवी मुंबईत चार दिवसांपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यात केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर सर्वपक्षीय राजकीय पातळीवरही रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसांत नवी मुंबईत एकही रस्ता किंवा गल्लीतून  रॅली गेली नाही हे शोधणे अवघड आहे. एवढा या अमृत महोत्सवाला प्रतिसाद मिळाला आहे. शहरात सर्वच ठिकाणी चार दिवसांपासून देशभक्तीपर गीतांचा आवाज घुमत असल्याने देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याने आझादी का अमृत महोत्सव नवी मुंबईत चार दिवसांपासून साजरा करण्यात येत आहे. यात शाळा, महाविद्यालये अगदी खासगी संस्था, सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतल्याने शहरात तीन दिवसांपासून देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले. या उपक्रमात राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला आहे.

ऐरोलीचे आ. गणेश नाईक यांनी काढलेल्या बाईक रॅलीवेळी आलेल्या पावसानेही उत्साह कमी झाला नाही. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही यात सहभाग घेतला होता. शुक्रवारी दिघा ते बेलापूर अशी रॅली काढण्यात आली होती. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी काढलेल्या रॅलीत देशासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींची वेशभूषा केलेले दृश्य सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीत मोठय़ा प्रमाणात महिलांचाही सहभाग होता. हम सब एक हैचा नारा देत वाशी, सानपाडा, जुईनगर भागांत माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी काढलेली ज्येष्ठ नागरिकांची दुचाकी रॅली अनोखी ठरली. या शिवाय वाशीत काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांनीही तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.

विविध संस्थांतर्फे तिरंगा रॅली

शहरातील बहुतांश शैक्षणिक संस्थांनीही तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. त्यात सर्वाधिक रॅली या सोमवारी स्वातंत्र्यदिनी काढण्यात आल्या. त्यामुळे जवळपास गावठाण आणि सेक्टर भाग झोपडपट्टीबहुल भागांतही अनेक तिरंगा रॅलींमुळे देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. यात शालेय विद्यार्थानी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू आदींची केलेली वेशभूषा लक्ष वेधून घेत होती. यात पोलीस विभाग आणि मनपा विभागही मागे नव्हता. शनिवारी दोन्ही विभागांनी संयुक्त रॅलीचे आयोजन केले होते.