नवी मुंबई : कोपरखैरणेतून वाशी वा एपीएमसीमध्ये जाताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खैरणे ते कोपरीदरम्यान (सेक्टर २६ ) एका उड्डाण पुलाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे बोनकोडे खैरणे, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातून थेट एपीएमसीत जाणे शक्य होणार असल्याने या मार्गावरील गाड्यांचा अन्य मार्गावरील ताण कमी होणार आहे. तसेच वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.
वाशी – पावणे उड्डाणपूल आणि ब्ल्यू डायमंड हॉटेल ते कोपरी सेक्टर-२६ सिग्नल येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने खैरणे (कोपरखैरणे सेक्टर ११ ) येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम चालू केले आहे. कार्यदेशानुसार ५ कोटी ५६ लाख रुपये खर्चाचे हे काम असून सप्टेंबर २०२४ मध्ये ते पूर्ण होणार आहे. या परिसरात लोकसंख्या आणि पर्यायाने वाहन संख्येत प्रचंड वाढ झाल्याने वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरीकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तुर्भे, ए.पी.एम.सी. मध्ये कामासाठी जाणारे माथाडी कामगार तसेच खरेदीसाठी जाणारे नागरिक यांची रात्री, तर नौकरदार व्यवायिक यांची दिवसा गर्दी पर्यायाने रात्री ११ ते पहाटे २ पर्यंतच हा मार्ग काहीसा शांत असतो. अन्य वेळेस वर्दळ असते.
कोपरखैरणे येथे माथाडी कामगार वसाहत पुष्कळ प्रमाणात असल्यामुळे कोपरखैरणे येथून एपीएमसी मार्केटला येण्यासाठी ब्ल्यू डायमंड चौक किंवा कोपरखैरणे रेल्वे स्थानक येथून बालाजी गार्डनमागील नाल्यावरून पावणे पुलाच्या चौकात यावे लागते. यामुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होते. परिणामी नागरिकांचा वेळ आणि इंधन याचीही हानी होते. वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोपरखैरणे पावणे पूल ते सेक्टर ११ मिसिंग लिंक जोडणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीमुक्त होऊन जनतेचा वेळ आणि इंधन यांची बचत होणार असून शहरातील प्रदूषणही अल्प होणार आहे.
हेही वाचा – पनवेल : अवकाळी पावसामुळे फूलदर चारपटीने वधारले
नव्याने होणाऱ्या पुलामुळे तुर्भे, एपीएमसी व सानपाडा येथून कोपरखैरणे तसेच ठाणे-बेलापूर रोडकडे येणाऱ्या लोकांची सुविधा होणार आहे. तसेच वाशी – कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावरून वाहनांची होणारी रहदारी अल्प होऊन वाहतूककोंडी कमी होणार आहे. या कामामध्ये नाल्यावर ४० मीटर लांबीचा आणि १२ मीटर रुंदीचा पूल, अप्रोच रस्ता १० मीटर लांब व ७.५० मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. हा भाग कोपरखैरणे वाहतूक पोलीस विभागाच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी अगोदरच मनुष्यबळ कमी असल्याने जेथे वाहतूक कोंडी तेथे धावत जावे लागते. त्यात जर हा उड्डाणपूल झाला तर बोनकोडे ते कोपरीदरम्यान सध्या कमी पडत असलेल्या पुलावरील ताण पर्यायाने आमच्यावरील ही ताण कमी होईल, अशी प्रतिक्रिया एका वाहतूक पोलिसाने दिली.
हेही वाचा – नवी मुंबई : पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची आवक वाढण्यास सुरुवात; दर स्थिर
खैरणे, बोनकोडे, सेक्टर १०, ११, १२, बोनकोडे बस थांबा या परिसरात दाट वस्ती आहे. येथील नागरिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी कोपरखैरणे सर्वात जवळचे स्टेशन असले तरी रिक्षा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोपरखैरणे आणि तुर्भेदरम्यान खैरणे येथे रेल्वे स्टेशनची मागणी केली जात आहे. ही मागणी प्रत्यक्षात उतरली तर प्रवाशांसाठी तसेच एपीएमसी व कोपरी गाव परिसरातील नागरिकांनाही खैरणे रेल्वे स्टेशनचा वापर शक्य होणार आहे. त्यामुळे पूल सर्वात जास्त फायदेशीर ठरणार आहे, असा दावा माजी नगरसेवक मुनावर पटेल यांनी केला आहे.