नवी मुंबई : ५० किलो वजन मर्यादेच्या अंमलबजावणीच्या प्रश्नावरून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथील कांदा-बटाटा बाजारात सोमवारी तणाव निर्माण झाला. १ मार्चपासून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची हाताळणी बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर माथाडी कामगारांनी प्रत्यक्षात जादा वजनाच्या मालाची उतराई रोखली. त्यामुळे बाजारातील व्यवहार काही काळ ठप्प झाले होते. परंतु, संध्याकाळी माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर माथाडी कामगारांनी गाड्यांमधून शेतमाल उतरवला असला तरी हा दिलासा तात्पुरता मानला जात असून, धुळवडीच्या सुट्टीनंतर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचे संकेत माथाडी कामागरांनी दिले आहेत.
सोमवारी बाजारात १५० हून अधिक कांदा-बटाट्याच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. यातील ५० किलो वजनाच्या गोण्या माथाडी कामगारांनी उतरवल्या. मात्र, ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची उतराई करण्यास नकार देत कामगारांनी कामबंदची भूमिका घेतली. परिणामी अनेक गाड्या आवारातच उभ्या राहिल्या आणि लिलाव प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर जाऊन काम थांबवण्याची विनंतीही करण्यात आली. त्यामुळे बाजारातील दैनंदिन खरेदी-विक्री व्यवहार दिवसभर ठप्प राहिले.
यापूर्वी २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पत्र देत १ मार्चपासून जादा वजनाच्या गोण्यांची हाताळणी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. जादा वजनामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. दरम्यान, एपीएमसी प्रशासनाने विविध आडत व्यापारी संघटनांना पत्र पाठवून ५० किलो वजन मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले आहेत.
व्यापारी संघटनांनी मात्र राज्यभर एकसमान अंमलबजावणीची मागणी केली आहे. इतर बाजार समित्यांमध्ये जादा वजनाच्या गोण्या स्वीकारल्या जात असताना केवळ मुंबई बाजारात कठोर अंमलबजावणी झाल्यास व्यापारावर परिणाम होईल, अशी त्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांकडे प्रमाणित वजनकाट्यांची उपलब्धता नसल्याने अचूक ५० किलो पॅकिंग करणे कठीण जाते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
व्यापाऱ्यांनी यात सामंजस्याची भूमिका घेतली असून, माघाडी कामगारांच्या भूमिकेला विरोध नसल्याचे म्हटले आहे. परंतु, गोण्यांची बनावट व्यापारी करत नसून, ज्या कंपन्या या गोण्या बनवतात त्यांना राज्य सरकारने निर्देश देऊन ५० किलो वजनाच्या गोण्या बनवण्याची विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे. तसेच माथाडी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये आणि शेतकऱ्यांचेही नुकसान करू नये अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली आहे.
दरम्यान, संध्याकाळी माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर गाड्या रिकाम्या करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र मंगळवारी धुळवडीची सुट्टी असल्याने बाजार बंद राहणार असून, बुधवारी पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे या वादावर लवकर तोडगा न निघाल्यास बाजारातील अनिश्चितता कायम राहण्याची चिन्हे आहेत.
