नवी मुंबई : मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारात सध्या पेरूची आवक झपाट्याने वाढत आहे. दररोज सरासरी चार ते पाच गाड्यांचा पुरवठा बाजारात होत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातून येणाऱ्या या पेरूला गुणवत्तेनुसार घाऊक बाजारात ३० ते १०० रुपये किलोपर्यंत दर मिळतो आहे. ‘तैवान पिंक’, ‘लखनऊ ४९’ आणि ‘आलाहाबाद सफेदा’सारख्या दर्जेदार जातींना ग्राहकांची खास मागणी आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नाशिक, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर पेरू बाजारात येतो आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील प्रयागराज, लखनौ, मध्यप्रदेशातील जबलपूर, गुजरातमधील सुरत आणि कर्नाटकातील बेळगाव येथूनही पेरूची आवक सातत्याने होत आहे. त्यामुळे बाजारात पेरूचे विविध प्रकार ग्राहकांना सहज उपलब्ध होत आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावरही या फळाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पेरूमध्ये आढळणारे ‘सी’ जीवनसत्त्व, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे आरोग्यविषयक जागरूकता असलेले ग्राहक मोठ्या प्रमाणावर पेरूची खरेदी करत आहेत. परिणामी, चव, रंग, टिकावू क्षमता आणि आकारमानानुसार दरात स्पष्ट फरक दिसून येत आहे. सध्या बाजारात सामान्य दर्जाच्या पेरूला ३० ते ५० रुपये किलो दर मिळतो आहे. तर ‘तैवान पिंक’, ‘लखनौ ४९’ आणि ‘आलाहाबाद सफेदा’सारख्या दर्जेदार जातींना ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. चव आणि टिकाऊपणाच्या आधारे ग्राहकांमध्ये या जातींची खास मागणी आहे.
सध्या पेरूची गुणवत्ता समाधानकारक असून बाजारात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे. यंदा पाऊस असला तरी पेरूचे मोठे नुकसान झालेले नाही, त्यामुळे दरही स्थिर आहेत, असे फळ व्यापारी बाळकृष्ण शिंदे यांनी सांगितले.
पेरूच्या काही प्रमुख जाती
- लखनऊ ४९ – उत्तर प्रदेशातून येणारी ही जात अतिशय चवदार आणि गोडसर असते. गडद हिरवा रंग आणि पांढरट गर ही याची वैशिष्ट्ये आहेत.
- तैवान पिंक – गुलाबी रंगाचा गर, मधुर चव आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक फळ. हॉटेल्स व हायएंड ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
- अलाहाबाद सफेदा – पांढरट गर असलेला रसदार व सौम्य चव असलेला पेरू. प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त आहे.
- बनारस पेरू – मध्यम आकाराचा, टिकावू आणि गोडसर चव असलेला पेरू.
- पुणे लोकल – किंचित आंबटगोड चव, जाड गर आणि टिकाऊपणा ही वैशिष्ट्ये.
पावसाळ्याच्या तोंडावरही पेरूला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बाजारात पेरूचे विविध प्रकार ग्राहकांना सहज उपलब्ध होत आहेत.