घाऊक बाजार फुलला ; रात्री उशिरापर्यंत खले; मात्र करोना नियमांना हरताळ

यंदा सरकारने करोना नियम शिथिल केल्याने गर्दीचा उच्चांक गाठल्याचे दिसून येत होते.

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाला जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या नवी मुंबईतील तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारातील पाचही घाऊक बाजारपेठा व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने मागील दोन दिवस गर्दीने फुलली असून ग्राहकांच्या प्रतिसादामुळे दुकानात पाय ठेवायला जागा नाही असे चित्र आहे.

या घाऊक बाजारात किरकोळ बाजारापेक्षा कमी किमतीत दिवाळीतील सर्वच प्रकारच्या वस्तू मिळत असल्याने हा बाजार सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. गेल्या वर्षी करोना साथीमुळे दिवाळी मनासारखी साजरी करता आली नाही मात्र यंदा सरकारने करोना नियम शिथिल केल्याने गर्दीचा उच्चांक गाठल्याचे दिसून येत होते. मात्र या गर्दीत करोनाचे प्रतिबंधक नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून येत होते.

नवी मुंबईतील तुर्भे व वाशी येथील सेक्टर १९ मध्ये अन्नधान्य, कडधान्य, मसाला, भाजी, फळे, कांदा-बटाटा- लसूनचे पाच घाऊक बाजारपेठा आहेत. याच ठिकाणी संपूर्ण मुंबई व आजूबाजूच्या सात महानगरपालिका क्षेत्रांना अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. घाऊक बाजारात व्यापार करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या बाजाराबाहेर असलेल्या किरकोळ विक्रेता दुकाने सुरू केली असून किरकोळ बाजारापेक्षा या ठिकाणी वीस ते तीस टक्के बाजारहाटही स्वस्त होत असल्याने अनेक ग्राहक तसेच गृहनिर्माण सोसायटय़ा या ठिकाणी खरेदी करीत असल्याचे दिसून येते. दिवाळीतील फराळासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची यापूर्वीच खेरदी झाली असून आता सजावटीच्या सामानांसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. यात घरातील सजावटीसाठी लागणारी विद्युत तोरणे, दिवे, यांची खरेदी देखील याच माथाडी भवन भागात होत असल्याने या ठिकाणी गर्दी उसळल्याचे दिसून आले.

बेफिकीरपणा

* एपीएमसीच्या घाऊक बाजारातील या गर्दीची पुनरावृत्ती शहराच्या प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी होत असल्याचे दिसून आले.

* वाशी सेक्टर ९ मधील पदपथरील विक्रीमुळे पदपथावर पाय ठेवण्यास जागा नव्हती.

* महालक्ष्मी पूजनास लागणारी महालक्ष्मीची मूर्ती, छायाचित्रांसह केरसुणीची विक्री अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दृश्य आहे.

*  गेल्या वर्षी करोना साथीचे सावट या खरेदीवर होते मात्र यंदा ही भीती दिसून न आल्याने ग्राहक बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apmc wholesale market at turbhe in navi mumbai open till late night zws

ताज्या बातम्या