नवी मुंबई : कांदा-बटाटा मालाच्या गोण्यांचे वजन मर्यादित करण्याच्या मुद्द्यावरून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ आणि माथाडी कामगार यांच्यातील वाद चिघळला आहे. ५० किलोपेक्षा जास्त वजनाचा माल बाजारात आल्यास १ मार्चपासून त्याची हाताळणी केली जाणार नाही, असा इशारा माथाडी कामगार संघटनेने दिला आहे. या भूमिकेला व्यापारी संघाने आक्षेप घेत राज्यभर एकसमान अंमलबजावणीची मागणी केली आहे. दरम्यान, एपीएमसीने संबंधित व्यापारी संघटनांना पत्र पाठवून वजन मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने २० फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्रानुसार, प्रतिगोणी ५० किलोपेक्षा जादा वजनाच्या कांदा-बटाटा शेतमालाची हाताळणी १ मार्चपासून बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. कामगारांच्या मते, जादा वजनामुळे आरोग्यावर परिणाम होत असून याबाबत पूर्वीही सूचना देण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर एपीएमसी प्रशासनाने कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ, ओमसाई कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ तसेच कांदा-बटाटा आडत सेवा संघ यांना पत्र पाठवले आहे. त्यात व्यापाऱ्यांनी आपल्या सभासदांना ५० किलो वजन मर्यादा काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना द्याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जादा वजनाचा माल बाजारात आढळल्यास त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी संबंधित आडत्यांवर राहील, असेही समितीने नमूद केले आहे.
दरम्यान, माथाडी कामगारांच्या मूळ मजुरी दरवाढीचाही मुद्दा पुढे आला आहे. २००२ साली निश्चित करण्यात आलेल्या मूळ मजुरी दरात वाढ न झाल्याची कामगारांची तक्रार असून, याबाबत शासनस्तरावर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. १ मार्चपासून जादा वजनाच्या गोण्यांची हाताळणी बंद झाल्यास कांदा-बटाटा बाजारातील व्यवहारांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि कामगार या तिन्ही घटकांमध्ये समन्वय साधून तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्यापाऱ्यांची भूमिका
- व्यापारी संघाने मात्र कामबंद आंदोलनाला विरोध दर्शवला आहे. ५० किलो मर्यादेबाबत त्यांचा तत्त्वतः विरोध नसला तरी संपूर्ण राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये एकाच वेळी अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
- अन्य बाजारांमध्ये जादा वजनाच्या गोण्या स्वीकारल्या जात असताना केवळ मुंबई बाजारात कठोर अंमलबजावणी केल्यास व्यापारावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
- शेतकऱ्यांकडे प्रमाणित वजनकाट्यांची उपलब्धता नसल्याने ५० किलोचे अचूक पॅकिंग करणे कठीण जाते. परिणामी, गोण्यांमध्ये कमी-अधिक वजन भरले जाते व तो माल विविध बाजारांमार्फत मुंबईत येतो.
- राज्यस्तरावर जनजागृती, शेतकरी मेळावे आणि गोणी उत्पादकांना मर्यादित क्षमतेच्या गोण्या तयार करण्याचे निर्देश देणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
