नवी मुंबई : देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस तुर्भे पोलिसांनी अटक केली. अटक आरोपी हा नेपाळ देशाचा नागरिक आहे.  राजबहादूर तुलबहादूर थापा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तुर्भे नाका परिसरातील आंबेडकर नगर येथे तो राहात आहे. मात्र त्याच्या संशयास्पद हालचाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम यांच्या मार्गदर्शखाली पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. त्याला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याने हे शस्त्र कुठून आणि कशासाठी आणले याचा तपास पोलीस करत आहेत.

विनयभंगप्रकरणी एक जण अटकेत

दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने रस्त्यावरून पायी जात असलेल्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने या युवकास अटक करण्यात आली. अक्षय शेळके असे आरोपीचे नाव आहे. रबाळे  येथे राहणाऱ्या या आरोपीने एका महिलेचा पाठलाग करणे सुरू केले होते. काही दिवस नियमित हा पाठलाग सुरू होता. त्याने दुचाकीवरून येत अचानक महिलेसमोर गाडी थांबवून तिचा विनयभंग करून फरार झाला. या महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करत या युवकाला अटक केली, अशी माहिती उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.

चोरीप्रकरणी चौकडी जेरबंद

काम करत असलेल्या कंपनीत साथीदारांच्या मदतीने चोरी करणाऱ्यास अटक करण्यात आली. सूरज निर्मल, कुलदीपकसिंग वीरेंद्र सिंग, कौशल सोनपाल वाल्मीकी, राजेश राजाराम यादव असे अटक करण्यात आलेल्या चौकडीची नावे आहेत. ठाण्यातील विवा फॅसिलिटी असून यातील फिर्यादी प्रणय लांबे हे कंपनीत कामगार पर्यवेक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या कडेच कामगारांच्या पगाराचे वाटप असते. याच कंपनीत सूरज निर्मल हा काम करतो. त्यामुळे प्रणय हे पगाराची रोकड बँकेतून कधी आणतात हे त्याला माहीत होते. ही रक्कम लुटण्याची योजना त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या समवेत आखली. त्यानुसार त्यांनी प्रणय हे पगाराची रोकड २ लाख १ हजार रुपये घेऊन जात असताना रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांना अडवत बेदम मारहाण केली आणि त्यांचीच दुचाकी घेऊन पसार झाले. या बाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून चौघांना अटक केली.

मानखुर्दमध्ये सत्तर गोणी गुटखा जप्त

मानखुर्दच्या मंडाले परिसरात वाहतूक पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट सहा यांनी टाकलेल्या छाप्यात ७० गोणी गुटखा जप्त करण्यात आला आहे. हा सर्व माल मानखुर्द पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मानखुर्द वाहतूक पोलिसांकडून सध्या दंड असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांना या गुटख्याबाबत माहिती मिळाली. मंडाले परिसरातील एका झोपडीत मोठय़ा प्रमाणात गुटखा असल्याचे वाहतूक पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत त्या ठिकाणी छापा घातला. या वेळी या झोपडीत पोलिसांना सत्तर गोणी गुटखा आढळून आला. अनिस शेख या इसमाची ही झोपडी असल्याचे तपासात समोर आले असून गुन्हे शाखा आणि वाहतूक पोलिसांनी सर्व माल मानखुर्द पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.