नवी मुंबई : शहरातील वाचनसंस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी यासाठी नवी मुंबई पालिका विविध उपक्रम राबवीत असून सानपाडा येथे अद्ययावत आणि आधुनिक असे प्रशस्त ग्रंथालय उभे करणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून तीस कोटी खर्चाच्या या प्रकल्पात केवळ ग्रंथालय न उभारता इमारतीतील प्रवासात आर्ट गॅलरीची रचनादेखील केली जाणार आहे.

नवी मुंबई पालिका लवकरच एक डबल डेकर बस घेणार असून मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबई दर्शनाचे पर्यटन सुरू करणार आहे. या पर्यटनात दर्शनासारखी काही पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून यातील आर्ट गॅलरी व साठ हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचे सुसज्ज असे ग्रंथालयाचा समावेश राहणार आहे.

देशातील पाच सुसज्ज ग्रंथालयांचा अभ्यास करून सानपाडा येथील ग्रंथालयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सानपाडा सेक्टर ११ येथे ११७० चौरस मीटरचा भूखंड सिडकोकडून विकत घेऊन पालिका हे ग्रंथालय उभारत आहे. चार मजली अधिक एक मजली ग्रीन छताचा समावेश असलेल्या या ग्रंथालय उभारणीचा खर्च तीस कोटींपेक्षा जास्त होणार आहे. या ग्रंथालयात तळमजल्यावर प्रदर्शन केंद्र राहणार असून यात पुस्तकांची विक्रीसह आर्ट ॲण्ड क्रॉप्ट विक्री कक्ष राहणार आहेत. पहिल्या मजल्यावर कॉमिक, नाटक, कौटुंबिक, ऐतिहासिक, कथा, कविता, ऑडिओ व्हिडीओ, कार्टुन अशा विविध साहित्य प्रकारांतील पुस्तकांची दालने राहणार आहेत. याच भागात मोठ्यांसाठी आत्मचरित्र, राजकीय, ऐतिहासिक, योगा, धार्मिक, नातेसंबध, कौटुंबिक अशा पुस्तकांची रचना करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व तरुणांसाठी दुसरा मजला असून यात अर्थशास्त्र, राजकारण, सामाजिक, अभियंता, विधि, मानसशास्त्र अशा पुस्तकांचा समावेश असणार आहे. याच मजल्यावर ऑडिओ व्हिडीओ व अभ्यासिका राहणार आहे. तिसरा मजला लहान मुलांसाठी राखीव असून यात शालेय अभ्यासाची पूरक पुस्तके असणार आहेत. या सुसज्ज ग्रंथालयात फिरताना अनेक पेटिंग्ज दिसणार असून या ग्रंथालयाच्या मार्गिकेत आर्ट गॅलरी साकारली जाणार आहे. त्यामुळे ग्रंथालयाकडे आकर्षणाचे एक कारण राहणार असून नवी मुंबईतील पहिली आर्ट गॅलरी नवी मुंबईकरांना मिळणार आहे.

झोपडपट्टीतही ग्रंथालयांचे नियोजन
पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाचन संस्कृतीला महत्त्व दिले असून सर्व भाषांमधील पुस्तकांचा या ग्रंथालयात समावेश राहील याकडे लक्ष दिले आहे. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मृती भवनातील ग्रंथालय सध्या अनेक वाचकांच्या आकर्षणाचे केद्र ठरले आहे. झोपडपट्टी भागही या वाचनाच्या आवडीपासून वंचित राहू नये यासाठी झोपडपट्टीत ग्रंथालये सुरू केली जाणार आहेत.