पनवेल : शवांची अदलाबदल झाल्यानंतर नातेवाईकांची कशी तारंबळ उडते याचा अनुभव पेझारी व सोमटणे येथील गावक-यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी आला. एमजीएम रुग्णालयाने यामध्ये त्यांची चूक नसून नातेवाईकांनीच दूस-या शवाची ओळख पटवून शव हस्तांतरण केल्याने ही घटना घडल्याचे सांगीतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग येथील पेझारी गावात राहणा-या रमाकांत पाटील आणि सोमटणे येथील राम पाटील यांचा चेहरा आणि नाम साधर्म्यातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने अलिबाग येथील पेझारी गावातील रमाकांत पाटील यांना सोमवारी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यामुळे रात्रभरासाठी पाटील यांचे शव रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले. या दरम्यान सोमाटणे गावातील राम पाटील यांचाही मृत्यू याच रुग्णालयात झाल्याने त्यांचेही शव त्याच शवागारात ठेवण्यात आले. मंगळवारी रमाकांत पाटील यांचे नातेवाईक शवागारातून रमाकांत यांचे शव घेऊन जाण्यासाठी आल्यावर शवागारातील कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तीचा चेहरा रमाकांत यांच्या नातेवाईकांना दाखविला. त्यानंतर त्यांचे शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा : नवी मुंबई शहरातून आठ महिन्यात ६ हजार किलो ई कचरा संकलित

रुग्णवाहिकेतून रमाकांत यांचे नातेवाईक पेझारी गावाकडे रवाना झाले. रमाकांत यांचे शव घेऊन जाणारी रुग्णवाहिका कर्नाळा खिंडीपर्यंत पोहचली असेल तोपर्यंत सोमाटणे गावातील राम पाटील यांचे शव ताब्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक शवागारात आले. या नातेवाईकांनी हे शव रमाकांत पाटील यांचे नसल्याचा दावा केल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने रमाकांत यांच्या शवाची वाहतूक करणा-या रुग्णवाहिका चालक व त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून रुग्णवाहिका परत बोलावून घेतली.

हेही वाचा : पनवेल : एका मृत उंदरामुळे ‘महाभारत’ , नातेवाईकांत हाणामारी, गुन्हा दाखल

राम पाटील व रमाकांत पाटील यांचे चेहरे एकसारखे दिसत असल्याने हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. तसेच नातेवाईकांनी दोन्ही मृत व्यक्तींच्या नावाच्या सुरुवातीला असलेल्या इंग्रजी मुळाक्षरांमधील ‘आर’ मुळे शवागारातील कर्मचा-याचा गोंधळातून ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. एमजीएम रुग्णालय शव नातेवाईकांना हस्तांतरण करताना हस्तांतरण प्रक्रीयेवेळचे छायाचित्र काढून घेतले जात असून नातेवाईकांनी ओळख पटविल्याशिवाय शव दिले जात नसल्याचे बुधवारी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. राम पाटील यांच्या नातेवाईकांमुळे मोठा अनर्थ टळल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगीतले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As the dead body was changed the relatives started running mgm hospital alibaug pezari village panvel tmb 01
First published on: 28-09-2022 at 14:10 IST