उरण : ऐतिहासिक घारापुरी बेटावरील शेतबंदर आणि मोरा बंदर परिसरात संशोधनादरम्यान काही पुरातन वस्तू आढळल्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अधिक सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणातून आणि खोदकामातून ऐतिहासिक घारापुरी बेटावरील इतिहासावर आणखी प्रकाश पडण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या पुरातन बेटावर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामात दळणकांड करण्यासाठी वापरात येणारी पुरातन काळातील जाते, मडकी, भव्य शिवलिंग, विविध पुरातन वस्तूंचे भग्न अवशेष अनेकदा सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतबंदर गावातील स्मशानभूमी ते सीता गुंफा या एक हजार मीटर लांबीच्या परिसरात केलेल्या सर्वेक्षणात विविध पुरातन वस्तू आढळून आल्या.
तसेच मोरा बंदर येथील डोंगराच्या पायथ्याशी व समुद्राला मिळणाऱ्या ओढे, नाले यांच्यामध्ये सोने, चांदी व इतर धातूंच्या मुद्रा, नाणीही आढळून येतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आणखी उत्खनन करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी या ठिकाणी खोदकाम करून शोध घेतला जाणार आहे. यासाठी ४ ते ६ महिने सुमारे ७० मजूर खोदकाम करणार आहेत.
काळ्या पाषाणात कोरलेल्या या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. त्या पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक घारापुरी येथे येतात. या निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या उत्खननामुळे लाभ होणार आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम
एलिफंटा बेट चार किमी चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारित येतो. पुरातत्त्व, नौदल, बंदर विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीचेही क्षेत्र आहे. सिडकोकडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम होणार आहे. त्यानंतर पर्यटन, पर्यटकांसाठी विकास मॉडेल व आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्ती करण्यात येणार आहे.
शेतबंदर गाव, मोरा बंदर या दोन्ही ठिकाणी आणखी उत्खनन करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी या ठिकाणी खोदकाम करून शोध घेतला जाणार आहे. यासाठी ४ ते ६ महिने सुमारे ७० मजूर खोदकाम करणार आहेत.
