नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या डिजिटल सेवा अधिक सुलभ तसेच प्रभावीपणे वापरता याव्यात यादृष्टीने महापालिकेने नवी मुंबईकरांना वर्षभराचे एकत्र बिल (देयक) देण्याचा निर्णय घेतला. हे देयक नवी मुंबईकर करदाते तीन महिन्यांत भरू शकतात आणि त्यांना त्याबदल्यात १० टक्क्यांची सूट देण्याचा निर्णयही महापालिका आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी घेतला. असे असले तरी अनेक नागरिकांना ऑनलाइन बिल भरण्यास तांत्रिक अडचण येत असल्याचा अनुभव वारंवार येऊ लागला असून या तक्रारी नेमक्या कोणाकडे करायच्या असा प्रश्न करदात्यांना पडला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मालमत्ता कराशी संबंधित विविध सेवा आणि सुविधा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला होता. नागरिकांना घरबसल्या मोबाइलवर मालमत्ताकराचे देयक पहायला मिळावे आणि ते भरताही यावे यासाठी आयुक्त आग्रही होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात साडेतीन लाख मालमत्ताधारक आहेत. महापालिकेने गेल्या २०४-२५ या आर्थिक यंदाच्या मालमत्ताकर वसुलीत रेकॉर्डब्रेक ८२६ कोटी एवढी मालमत्ता कर वसुली केली आहे.
मालमत्ता कर भरणा प्रक्रियेत अधिकाधिक सुलभता पालिकेने प्राप्त करून दिली आहे. परंतु ऑनलाइन बिल भरताना अनेक वेळा एरर दाखवला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मालमत्ता धारकांना यापूर्वी वेळेत बिल प्राप्त होत नसल्याने मुदतीत बिल भरणा होत नसल्याने दंडही भरावा लागत होता. प्रथमच पालिकेने ऑनलाइन पध्दतीने विविध डिजिटल साधनांचा वापर करून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असली तरी या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
अडचणी सोडविण्याचा प्रयत्न
दरम्यान, ॲानलाइन बिले भरताना काही तांत्रिक अडचणी उद्धभवत असल्याच्या तक्रारी मालमत्ता कर विभागास प्राप्त होत असल्याची माहिती आहे. मालमत्ता देयके प्राप्त झाल्याने तसेच ही बिले एकत्र भरल्यास १० टक्के सवलत दिल्याने जवळजवळ ३०० कोटीपर्यंत मालमत्ता कर जूनमध्येच जमा झाला आहे. ऑनलाइन बिल भरताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या सोडवण्यात येत आहेत. त्यासाठी पर्यायही दिले आहेत. १० टक्के सूट देण्याची मुदत फक्त ३० जूनपर्यंतच असणार आहे. त्यानंतर सूट दिली जाणार नाही, अशी माहिती मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली.
नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता बिले भरण्यासाठी ३० जूनपर्यंत बिल भरल्यास बिलात १० टक्के सवलत देण्याची योजना आणली असली तरी त्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. घरबसल्या बिल भरताना ऑनलाइनद्वारे प्रक्रिया करताना वारंवार एरर दाखवत असल्याने सामान्य नागरीकांना बिल भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मालमत्ता बिलात १० टक्के सवलतीची मुदत १५ दिवस वाढवावी. – सुधीर दाणी, सजग नागरिक मंच