पनवेल : राज्य सरकारने १७ हजार ८०० कोटी रुपये खर्च करुन २१ किलोमीटर अंतराचा समुद्रावर अटलसेतू बांधला परंतू अटलसेतूवरुन मुंबई पूणे या मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या ५० हजार वाहनांना सध्या पनवेलमधील कोळखे गाव ते कोन गावापर्यंत मंदगतीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कोळखे ते कोन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर उन्नत मार्ग बांधणार असून यासाठी सूमारे एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ही मार्गिका बांधकामासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागणार असून कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असली तरी या मार्गिकेचे काम कंत्राटदाराने सुरु केलेले नाही. त्यामुळे अजून अडीच वर्षे अटलसेतू ते पुणे प्रवास करणाऱ्यांना पनवेलमध्ये कोंडीचा सामना करावा लागणार. सध्या पनवेलमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ म्हणजे कोळखे गाव ते कोन गावापर्यंतचा मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरुन पनवेलमध्ये येणारा मार्ग आणि द्रुतगती मार्गाला पनवेल शहराला जोडणाऱ्या मार्गावर दिवसाला सूमारे ५० हजार वाहने या मार्गावरुन धावतात. अटलसेतूवरुन मुंबईतून आलेली हलकी वाहने याच मार्गावरुन द्रुतगती मार्गाला जोडली जातात. रसायनी येथील औद्योगिक वसाहतीला व पुढे शेडूंग टोलनाक्याला जोडणारा हाच मार्ग असल्याने या मार्गावर वाहतूकीचा ताण वाढला आहे. पळस्पे फाट्यावरील कोळखे गावाजवळ बांधलेल्या पुलावर १२ मार्गिका आहेत. मात्र पळस्पे पुलावरुन या मार्गावर गाड्या उतरल्यानंतर तो मार्ग अवघ्या सहा मार्गिकांमध्ये बदल होत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सदैव अनुभवायला मिळते. आणखी वाचा-विजय चौगुलेंचे गणेश नाईक यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू राज्य सरकारने समुद्रावर १६.५ किलोमीटर अंतरावर आणि जमिनीवर ५.५ किलोमीटर अंतरावर अटलसेतू बांधला. मात्र या महामार्गाला जोडणाऱ्या अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर कोळखे ते कोन गावापर्यंत मार्गिका न बांधल्यामुळे वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येला ५० हजार वाहनचालक दररोज तोंड देत आहेत. याबाबत एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या पल्यावर १ हजार रुपये खर्च करुन उन्नत मार्ग बांधणार असल्याचे सांगितले. संबंधित मार्ग बांधण्यासाठी कंत्राटदार नेमला आहे. मात्र कंत्राटदाराचा काम पुर्ण करण्याचा कालावधी ३० महिन्यांच्या असल्याचे या अधिकाऱ्याने सांगीतले. आणखी वाचा-वाशीतील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित तात्पुरत्या स्वरुपात कोंडी कशी कमी होईल. हा उन्नत मार्ग बांधण्यासाठी अजूनही ३० महिने लागतील. वाहनचालकांना कोंडीतून तात्पुरता दिलासा मिळण्यासाठी एमएमआरडीए व एमएसआरडीसीला पुढाकार घ्यावा लागेल. तात्पुरत्या स्वरुपात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कोळखे ते कोन गावापर्यंत रस्ता सूमारे १५ फूट रुंद करणे गरजेचा आहे. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण केल्यास काही महिने का होईना कोंडी कमी होईल. तसेच अवजड वाहने रस्त्यावर वळसा घेत असल्याने कोंडी होते. अवजड वाहनांना वळसा घेण्यासाठी या रस्त्यावर बंदी केल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होईल अशी वाहनचालकांची मागणी आहे. पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी कोंडी कमी होण्यासाठी उपाययोजना एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना सुचविल्या आहेत. मात्र अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही.