सरासरी ६० टक्के हजेरी; आणखी वाढ होण्याची आशा

नवी मुंबई :  आठवी ते बारावीची शाळा ४ ऑक्टोबरपासून   सुरू करण्यात आली मात्र दुसऱ्याच आठवडय़ात विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली होती. आता दिवाळीनंतर शाळा सुरू  झाल्यानंतर यात पुन्हा वाढ झाली आहे. करोना संसर्गाची भीती व विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेतील गैयसोयींमुळे विद्यार्थी उपस्थिती कमी होते. सध्या काही महापालिका शाळांत ८० टक्क्यांपर्यंत उपस्थिती आहे तर एकूण महापालिका शाळेत सरासरी उपस्थिती ६० टक्क्यांपर्यंत आहे. खासगी शाळेतील उपस्थितीही वाढत आहे.

करोनाच्या दोन लाटांनंतर अखेर ऑक्टोबरपासून इयत्ता ८वी ते १२वीच्या विद्यर्थ्यांचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.मात्र सुरू केल्यानंतर दुसऱ्या आठवडय़ात उपस्थिती घटली होती, मात्र आता दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली असून महापालिका शाळेत विद्यर्थ्यांची उपस्थिती वाढत आहे तर खासगी शाळेत मात्र कमी आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

करोनामुळे गले दीड वर्ष शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मात्र यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत होते. त्यामुळे शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत होती. नोव्हेंबर अखेपर्यंत राज्यातील करोना रुग्णांत मोठी घट होत करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून नवी मुंबईतील शाळा या वर्गाच्या शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू होण्याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यामुळे पहिल्या आठवडय़ात शाळांतील उपस्थिती चांगली होती. मात्र त्यानंतरही पालकांच्या मनातील करोनाची भीती कायम असल्याने अनेकांनी मुलांना ऑनलाइन वर्गाला बसविणे पसंत केले. शाळांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक बसमधून प्रवास करू नये. शाळेची बस किंवा पालकांनी प्रत्यक्षात मुलांना शाळेत सोडावे अशी विनंती केली होती. यामुळे शाळेपासून दूरवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला होता. या विविध कारणांमुळे शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या आठवडय़ापासून शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली होती.

दरम्यान २८ ऑक्टोबर ते २०नोव्हेंबपर्यंत दिवाळी सुट्टी होती. या काळात मोठी गर्दी झाल्याने रुग्णवाढीचा धोका होता. मात्र त्यानंतरही रुग्णसंख्या स्थिर राहिली. काही ठिकाणी यात घटही दिसून आली. त्यामुळे करोनाची पालकांमध्ये असलेली भीती कमी होत असल्याने शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. महापालिका शाळांत सरासरी ६० टक्के उपस्थिती असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

दिवाळीनंतर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून पुढील आठवडय़ात आणखीन विद्यार्थी संख्या वाढेल. खासगी शाळेत मात्र अद्याप विद्यार्थी उपस्थिती कमीच आहे.

जयदीप पवार, शिक्षण अधिकारी, महापालिका