नवी मुंबई : वाशीतील अवनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासातील एफएसआय मंजुरीवरून सुरू झालेल्या वादात आता चौकशीपेक्षा कारवाईलाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणात नगररचना विभागाचे अधिकारी सोमनाथ केकाण यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असली, तरी त्यांच्यावरील चौकशीचा अहवाल अद्याप सभागृहासमोर आलेला नाही. मात्र, हा अहवाल सभागृहासमोर सादर होईपर्यंत केकाण यांना महापालिका मुख्यालयात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे चौकशीचे निष्कर्ष येण्याआधीच केकाण यांना कारवाईच्या कक्षेत आणण्याच्या महापौरांच्या भूमिकेमुळे आयुक्तांवर प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

अवनी सोसायटीच्या पुनर्विकासाला ३ एफएसआय मंजूर करताना नियमांचे पालन झाले का, हा या वादाचा मूळ मुद्दा आहे. वाशी सेक्टर ९ मधील भूखंड क्रमांक १६, कॉन्डोमिनियम क्रमांक १६ मधील अवनी सोसायटीच्या ५,३३०.०४ चौरस मीटर भूखंडाला प्रत्यक्ष १२ मीटर रुंदीचा प्रवेश रस्ता असताना, शेजारील एअर इंडिया सोसायटीच्या भूखंडाला लागून असलेल्या ३२ मीटर रुंदीच्या रस्त्याचा लाभ देऊन अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्यात आल्याचा आक्षेप आहे. या मंजुरीच्या आधारे १५,९९०.१२ चौरस मीटर बांधकाम क्षेत्राला मान्यता देण्यात आली. मात्र, संबंधित रस्त्याच्या रुंदीच्या आधारे एवढा एफएसआय मंजूर करता येतो का, यावर महासभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि मंजुरी प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठी महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. संपूर्ण कॉन्डोमिनियमचे क्षेत्रफळ, दोन्ही सोसायट्यांच्या भूखंडांचे एकत्रीकरण, एअर इंडिया सोसायटीची संमती, सीआयडीसीओची परवानगी आणि एफएसआयची गणना अशा विविध बाबींची तपासणी करण्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे, मूळ मंजुरी प्रक्रियेत सहभागी नसलेल्या वरिष्ठ नगररचना अधिकाऱ्यामार्फत तांत्रिक तपासणी करून घेण्यासही सांगण्यात आले आहे. म्हणजेच, मंजुरी प्रक्रियेत नेमक्या कोणत्या टप्प्यावर त्रुटी राहिल्या आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, हे अद्याप तपासायचे आहे.

मात्र, या चौकशीचा निष्कर्ष येण्याआधीच केकाण यांच्या महापालिका मुख्यालयातील प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशी अहवाल सभागृहासमोर ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर असताना, तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला महापालिका इमारतीत प्रवेश न देण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे चौकशीच्या निष्कर्षांची प्रतीक्षा न करता कारवाईची भूमिका घेण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, केकाण यांच्या प्रवेशबंदीमागे यापूर्वीच्या नैवेद्य आणि अलबेला सोसायटी प्रकरणातील महासभेचा निर्णयही कारणीभूत ठरला. या प्रकरणात केकाण यांना कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ पदावर पाठविण्याचे निर्देश महासभेने दिले होते. मात्र, त्यानंतरही केकाण महापालिका कार्यालयात येऊन कामकाज करत असल्याचे सांगत हा महासभेचा अपमान असल्याचा मुद्दा नगरसेवक सूरज पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी चौकशी अहवाल सभागृहासमोर येईपर्यंत केकाण यांना महापालिका मुख्यालयात प्रवेश देऊ नये, असे निर्देश आयुक्तांना दिले.मात्र, एखाद्या अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी आवश्यक असताना, अहवाल येण्याआधीच त्याच्याविरोधात अशा प्रकारचे निर्बंध घालणे कितपत योग्य, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

चौकशीला १५ दिवसांची मुदत; पण कारवाई आधीच सुरू

या प्रकरणाचा पहिला कार्यवाही अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात संबंधित कागदपत्रांची तपासणी, नोटीस बजावण्याची प्रक्रिया, सुनावणी आणि पुढील कार्यवाहीचा तपशील देण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजेच चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू असतानाच संबंधित अधिकाऱ्याच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवनी सोसायटीला मंजूर झालेल्या अतिरिक्त एफएसआयमागे नेमकी कोणाची भूमिका होती, मंजुरी देताना कोणत्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची छाननी केली आणि नियमांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला का, या प्रश्नांची उत्तरे चौकशीतून मिळणे अपेक्षित आहे.

अवनी प्रकरणात दोषींवर कारवाई होणे आवश्यक असले, तरी त्यासाठी निष्पक्ष चौकशी आणि नियमबद्ध प्रक्रिया तितकीच महत्त्वाची आहे. एका बाजूला संपूर्ण मंजुरी प्रक्रियेची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश आणि दुसऱ्या बाजूला चौकशी अहवाल येण्याआधीच एका अधिकाऱ्याच्या प्रवेशावर बंदी, यामुळे महापौरांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता आयुक्त या निर्देशांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करतात आणि चौकशीचा अहवाल प्रत्यक्षात कोणाची जबाबदारी निश्चित करतो, यावर या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे.