जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटलं आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दरम्यान आजपासून सुरु होत असणाऱ्या या आंदोलनाचा पहिला परिणाम पनवेलमध्ये पहायला मिळाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलाय.

पनवेलमध्ये घडलं काय…
मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एक व्हिडीओ जारी करुन आज सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नसल्याचा दावा केलाय. “आज पनवेलमध्ये पहाटे ४ वाजून ५० मिनिटांची आणि ६ वाजून ८ मिनिटांची अजान भोंग्यावरुन न होता फक्त तोंडाने बोलून झाली, असं चिले यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या आवाहनाला पनवेलमधील मुस्लीम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेकडून मुस्लीम बंधवांचे आभार देखील चिले यांनी व्यक्त केले आहेत. या पुढेही अशीच अजान भोंग्यांवर न देता तोंडी द्यावी, असंही चिले यांनी म्हटलं आहे. तसेच जर या पुढे भोंग्यांवर अजान दिली गेली तर हनुमान चालिसा सुद्धा भोंग्यावरच ऐकावी लागेल, असा इशारा देखील मनसेकडून देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये २९ जणांना ताब्यात घेतलं
दुसरीकडे नाशिकमध्ये भोंग्यावरुन हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या २९ मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी काही महिला कार्यकर्त्या असून त्या रात्री १२ नंतर रस्त्यांवर जय श्री राम, हनुमान की जय, जय मनसे अशा घोषणा देत असल्याचे काही व्हिडीओही समोर आले आहेत.

राज काय म्हणाले?
दरम्यान, राज यांनी मंगळवारी सायंकाळी जारी केलेल्या पत्रकामध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी, असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

नागरिकांनी काय करावं याबद्दल राज काय म्हणाले?
देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात येऊन द्यावीत. मशिदीत बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या १०० क्रमांकावर भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार करावी. ती रोज करावी, असा कार्यक्रमही राज ठाकरे यांनी जाहीर केला. तसेच ज्या मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत त्याचे स्वागत करत त्या मशिदीच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही याची हिंदुंनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

एवढे तुरुंग देशात नाहीत…
हा विषय एका दिवसात सुटणार नाही. प्रत्येक राज्यातील हिंदुंनी आपापल्या सत्ताधारी-राज्यकर्त्यांना हिंदुंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे. देशाच्या कारागृहात तमाम हिंदुंना डांबणे सरकारला शक्य होणार नाही हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.