नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीतील प्रगतीसाठी व्यक्त केलेली औद्योगिकीकरणाची गरज, संघराज्य पद्धतीत राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याबाबतचा आग्रह आणि स्वदेशी मालाच्या अट्टाहासावर आसूड ओढणारे त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी बुधवारी ‘जागर’ व्याख्यानमालेत केले.
देशाला दिशा देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी करकरीत बुद्धिमत्तेची माणसे महाराष्ट्रात निर्माण झाली याचा सर्वानाच आदर व अभिमान असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेने ‘जागर २०२०’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अर्थतज्ज्ञ’ या विषयावर व्याख्यान देताना कुबेर यांनी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रातील विचार आणि कार्याचा आढावा घेतला.
बाबासाहेबांनी त्या काळात मांडलेले विचार आजही कालसुसंगत वाटतात, हे त्यांच्या दूरदृष्टी आणि अफाट विद्वत्तेचे दर्शन घडवणारे आहे, असे कुबेर म्हणाले. याचे दाखले देताना त्यांनी काही उदाहरणे दिली. ‘शेतीच्या प्रगतीसाठी देशात औद्योगिकीकरण वाढायला हवे,’ अशी आग्रही भूमिका बाबासाहेबांनी घेतली होती. संघराज्य पद्धतीत राज्यांना अधिक महत्त्व द्यायला हवे, त्यांना आर्थिक वरस्वायत्तता हवी, अशी त्यांची ठाम भूमिका होती, असे कुबेर यांनी डॉ. आंबेडकरांच्या लेखनाचे संदर्भ देत सांगितले. स्वदेशी मालाच्या वापराबद्दल आज टोकाची भूमिका घेतली जात असली तरी, ती पूर्णपणे चुकीची असल्याचे बाबासाहेबांनी त्या काळी ठासून सांगितले होते, याची आठवणही कुबेर यांनी करून दिली. बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुषंगाने व्याख्यानाची मांडणी करत ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा बाबासाहेबांचा ग्रंथ अभ्यासपूर्वक असून तो प्रत्येकाने वाचावा, असे आवाहनही त्यांनी केले.‘बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात तीन वर्षांत २९ अभ्यासक्रम पूर्ण केले. यावरून त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची झेप लक्षात येते. युरोपातील नामांकित अर्थतज्ज्ञ प्रा. जॉन केन्स यांच्यासह अर्थशास्त्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांच्या अर्थविषयक विचारांचा सन्मान केला आहे असे ते जातिवंत अर्थशास्त्री होते. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया संस्थेच्या निर्मितीमागे बाबासाहेबांचे विचारसूत्र होते,’ असे कुबेर म्हणाले. सर्व स्तरांतील लोकांना सहज कळेल अशी अर्थशास्त्राची मांडणी हे बाबासाहेबांचे वैशिष्टय़ होते. बाबासाहेबांचे भाषासौष्ठव, तर्कसंगतता, मूल्यांची मांडणी व सहजता हे सारे लक्षणीय होते, असे ते म्हणाले.अनेक माणसे उभे आयुष्य खर्ची घालून एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवितात. मात्र एकाच जीवनात विविध क्षेत्रांमध्ये महनीय काम बाबासाहेबांनी केल्याचा गौरवोल्लेख कुबेर यांनी आपल्या व्याख्यानात केला.
शेती, संघराज्याबाबत बाबासाहेबांची मते आजही कालसुसंगत
राज्यांना अधिक महत्त्व द्यायला हवे, त्यांना आर्थिक स्वायत्तता हवी, अशी त्यांची ठाम भूमिका होती, असे कुबेर यांनी डॉ. आंबेडकरांच्या लेखनाचे संदर्भ देत सांगितले. स्वदेशी मालाच्या वापराबद्दल आज टोकाची भूमिका घेतली जात असली तरी, ती पूर्णपणे चुकीची असल्याचे बाबासाहेबांनी त्या काळी ठासून सांगितले होते, याची आठवणही कुबेर यांनी करून दिली. बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुषंगाने व्याख्यानाची मांडणी करत ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा बाबासाहेबांचा ग्रंथ अभ्यासपूर्वक असून तो प्रत्येकाने वाचावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात तीन वर्षांत २९ अभ्यासक्रम पूर्ण केले. यावरून त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची झेप लक्षात येते. युरोपातील नामांकित अर्थतज्ज्ञ प्रा. जॉन केन्स यांच्यासह अर्थशास्त्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांच्या अर्थविषयक विचारांचा सन्मान केला आहे असे ते जातिवंत अर्थशास्त्री होते. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया संस्थेच्या निर्मितीमागे बाबासाहेबांचे विचारसूत्र होते,’ असे कुबेर म्हणाले. सर्व स्तरांतील लोकांना सहज कळेल अशी अर्थशास्त्राची मांडणी हे बाबासाहेबांचे वैशिष्टय़ होते. बाबासाहेबांचे भाषासौष्ठव, तर्कसंगतता, मूल्यांची मांडणी व सहजता हे सारे लक्षणीय होते, असे ते म्हणाले.
अनेक माणसे उभे आयुष्य खर्ची घालून एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवितात. मात्र एकाच जीवनात विविध क्षेत्रांमध्ये महनीय काम बाबासाहेबांनी केल्याचा गौरवोल्लेख कुबेर यांनी आपल्या व्याख्यानात केला.
पालिकेचे कौतुक
ऐरोली येथील डॉ. आंबेडकर स्मारकात उभारण्यात आलेल्या वाचनालयाबद्दल कुबेर यांनी नवी मुंबई महापालिकेचे कौतुक केले. या स्मारकातून वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी उत्तम काम होत असून सरकारी चौकटीच्या पलीकडे जाऊन विचारांची परंपरा जपण्याचे काम नवी मुंबई महापालिका करत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.