नवी मुंबई : यंदा मान्सून दहा दिवस लवकर येण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची मान्सूनपूर्व कामे आटपण्याची लगबग सुरू झाली आहे. नवी मुंबई पालिकेने महावितरण, रिलायन्स, टाटा यासारख्या शासकीय व खासगी कंपन्यांनी भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले खड्डे बुधवापर्यंत (११ मे) बुजवण्याचे आदेश जारी केले आहेत.
याशिवाय पालिकेने यंदा शहरात काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी उपसा करण्याचे २५ पंप जादा तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने बांधलेल्या काही भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचण्याच्या घटना नवी मुंबईत दरवर्षी घडत आहेत.
दरवर्षी सात जूनच्या सुमारास पडणारा पाऊस यंदा दहा दिवस अगोदर पडण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. पुढील आठवडय़ात हा पाऊस अंदमान, निकोबार आणि त्यानंतर केरळमधून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारपणे स्थानिक स्वराज्य संस्था ३१ मेपर्यंत नागरी तसेच मान्सूनपूर्व कामे करण्याची मुदत कंत्राटदारांना देत होती. पण यंदा ही मुदत दहा दिवस अगोदर अर्थात २५ मेपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने २० मेपर्यंत काही कामे करण्याच्या सूचना सर्व कंत्राटदारांना दिलेल्या आहेत.
नवी मुंबई शहर हे खाडी किनारी वसलेले आहे. त्यामुळे खाडी किनारी येणारे भरती, ओहोटीचे पाणी रोखण्यासाठी सिडकोने नेदरलॅन्डच्या धर्तीवर उघाडी पध्दत अमलात आणली आहे. भरतीचे पाणी येणाऱ्या ठिकाणी मोठय़ा आकाराची तळी बांधण्यात आली असून भरती आणि पाऊस या काळात वाढलेले पाणी शहरात घुसणार नाही याची काळजी या उघाडी पद्धतीने घेण्यात आलेली आहे. नवी मुंबईत अशी आठ धारण तालव आहेत. यातील दोन धारण तलाव हे शहराला खेटून असल्याने त्यांची दरवर्षी साफसफाई अनिवार्य झाली आहे. या धारण तलावांत खारफुटीची जंगल आढळून आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने या तलावांची साफसफाई देखील करता येत नाही. त्यामुळे पावसाळय़ात या तलावांतील पाण्याची पातळी वाढत असल्याने उपसा पंप लावून या अतिरिक्त पाण्याचा उपसा करावा लागत आहे. या धारण तलावांच्या दरवाजांची दुरुस्ती २० मेपर्यंत पूर्ण केली जाणार असून वाशी व कोपरखैरणे येथील तलावांसाठी पंप तयार ठेवण्यात आलेले आहेत. महावितरण कंपनीने विद्युत जोडणी देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खड्डे खोदलेले आहेत. याशिवाय मोबाइल सेवा देणाऱ्या व्होडाफोन, टाटा यांसारख्या दूरसंचार कंपन्यांनी आपली सेवा देण्यासाठी खड्डे खोदलेले आहेत. त्यामुळे १० मेनंतर नवीन खोदकामाला बंदी घालण्यात आली असून त्यानंतर तात्काळ खड्डे बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
ऐरोली येथील टी जंक्शन, घणसोली, कोपरखैरणे, महापे, शिरवणे, वाशी, नेरुळ, बेलापूर या नोड मध्ये २१ पेक्षा जास्त ठिकाणी भुयारी मार्ग आहेत. ऐरोली टी जंक्षनला तर मुसळधार पावसात नदीचे स्वरूप येते. या सर्व ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्यास पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप यंदा तयार ठेवण्यात येणार आहेत. ऐरोली येथे चार पंपाची तजवीज करण्यात आलेली आहे.
याशिवाय सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार असून वेळप्रसंगी या केंद्राच्या वतीने पाण्याचा निचरा करता येणार आहे. लवकर पाऊस पडणार आहे याचबरोबर यंदा अतिवृष्टीची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने सर्व तयारी सुरू केली आहे.
रस्ते सुस्थितीत
नवी मुंबई पालिकेच्या एमआयडीसी हद्दीत १३६ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यातील मुख्य रस्त्याचे सिमेंट क्राँक्रिटीकरण केले गेले आहे. यंदा पालिकेने तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट क्राँक्रिटीकरण पूर्ण करीत आणले आहे तर एमआयडीसीच्या अखत्यारीतील २१ किलोमीटर लांबीचे काम वर्षां अखेरपर्यँत होणार असून १५ किलोमीटर लांबीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीतील काही अंर्तगत रस्त्यांचा अपवाद वगळता मुख्य रस्ते सुस्थित झालेले आहेत. याशिवाय ठाणे बेलापूर व पामबीच मार्गाची डागडुजी यापूर्वीच करण्यात आली असून शीव पनवेल महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात् आले आहे. पालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत अनेक कामे ही यापूर्वीच केली असल्याने मान्सूनपूर्व कामाची यादी कमी झाली आहे.
सायरनचे प्रात्यक्षिक
नवी मुंबई पालिकेच्या मालकी मोरबे धरणातील आजूबाजूच्या १२ किलोमीटर परिसरातील ग्रामस्थांना सावध करणाऱ्या सायरनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असून अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन मोरबे धरणाच्या दरवाजांची डागडुजी करण्यात आलेली आहे. माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता यंदा आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या पावसाळय़ात जाणवल्यास मोरबे धरणातील पाण्याची क्षमता वाढवून घेण्याची सोयदेखील करण्यात आलेली आहे. पालिका क्षेत्रात सध्या हेटवणे व बारवी धरणाचे पाणी कमी येऊ लागले आहे.
यंदा पाऊस दहा दिवस अगोदर येणार असल्याने पालिकेने दहा दिवस अगोदर मान्सूनपूर्व कामे करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिलेल्या आहेत. बुधवारनंतर खड्डे खोदण्यास मज्जाव केला जाणार असून त्यानंतर हे खड्डे बुजविले जाणार आहेत. पालिकेने पहिल्यांदाच २५ जादा पंप तैनात ठेवलेले असून पाणथळय़ाच्या जागी ते बसविले जाणार आहेत. याशिवाय मोरबे धरणासाठी काही खबरदारी घेण्यात आलेल्या आहेत. दहा दिवस पाऊस लवकर आणि अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन तयारी करण्यात येत आहे. – संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका