उरण : पावसाळ्यात मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यासाठी खोल समुद्रातील मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाने बंदी घातली आहे. या बंदी काळामुळे उरणच्या करंजा व मोरा या बंदरावर शेकडो मासेमारी बोटी किनाऱ्यावर विसावू लागल्या आहेत. तसेच बोटीचे पावसापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. तसेच मासेमारी जाळीही सुरक्षित ठेवण्यात येत आहेत. मासेमारी
बंदीचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
या बंदीमुळे ताजी मासळीची आवक घटणार आहे. तर स्थानिक मासळीच्या मागणीत वाढ होणार आहे. खवय्यांना सुक्या मासळीचा पर्याय खुला आहे. मात्र मागील अनेक वर्षांत मासळीची आवकच घटू लागल्याने सुक्या मासळीच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. बंदी असल्याने दोन महिन्यांच्या काळात मत्स्य खवय्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. मत्स्यबीज उत्पादन आणि मासळीच्या प्रजननासाठी लागणारा कालावधी हा पावसाळ्यात सुरू होतो. पावसाळ्यातील जून व जुलै या दोन महिन्यांत विविध प्रकारचे मासे अंडी घालतात. त्यांनतर त्यांची पैदास होण्यास सुरुवात होते. या कालावधीत मासळीचे व मत्स्यबीज यांचे संरक्षण व्हावे यासाठी ही बंदी घातली जाते.




स्थानिक व किनारपट्टीवरील मासेमारांना काही नियमांचे पालन करीत मासेमारी करता येते. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने घातलेली बंदी व त्याचे नियम भंग केल्यास विभागाकडून कारवाई करण्यात येते. त्यामुळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.