ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात असलेल्या खारफुटीच्या संरक्षण व संवर्धनासाठी स्थानिक प्राधिकरणांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने नवी मुंबई पालिका अशा उपाययोजना करण्यास पुढे सरसावली आहे. याचाच एक भाग म्हणून खाडीकिनाऱ्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सिमेंट काँक्रीटचे खांब उभारण्यात आले आहेत तसेच रस्त्यात चर खणण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात डेब्रिज टाकले जात असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे करूनही काही पावले उचलली जात नसल्याने एका पर्यावरण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने खाडिकिनारी डेब्रिज टाकले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. या डेब्रिजमुळे खारफुटीचा नाश मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यावरणीचीही हानी होत असल्याचे दिसून येते. रातोरात खाडीकिनारी जाणाऱ्या या वाहनांना अटकाव व्हावा यासाठी पालिकेने खाडीकिनारी जाणाऱ्या नेरुळ, वाशी, सानपाडा, ऐरोली, कोपरखैरणे येथील मार्गावर जेसीबी लावून खड्डे खोदले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सिमेंटचे खांब लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे पालिका या खाडीकिनाऱ्यावर वाहनांना प्रवेश बंदी असल्याचे फलक लावणार आहे. नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्यावर आजही काही ग्रामस्थ मच्छीमारी करण्यासाठी जातात. त्यासाठी त्यांनी खाडीकिनारी तळी निर्माण केली आहेत. या प्रवेशबंदीमुळे या मासेमारांची अडचण होणार आहे. पालिकेने खारफुटी संवर्धनासाठी वर्षांला तीस लाख रुपये तरतूद केली आहे, मात्र हा निधी योग्य पद्धतीने खर्च केला जात नसल्याने नवी मुंबईतील खाडीकिनारे हे डेब्रिजमाफियांचे हक्काचे ठिकाण झाले आहे. मध्यंतरी या खाडीकिनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी कायमस्वरूपी पथक नेमले जाणार असल्याची घोषणा केली गेली होती, परंतु ती हवेत विरून गेल्याचे दिसून येते. त्यामुळेच नेरुळच्या डीपीएस शाळेच्या मागील बाजूस मोठय़ा प्रमाणात डेब्रिज पडत असल्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर पालिकेने उपाययोजनांना सुरुवात केली आहे.