scorecardresearch

सौंदर्यीकरणासाठी ४३ कोटींचा वापर

नवी मुंबई महापालिकेने केलेल्या चांगल्या कामासाठी वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाकडून पालिकेला आतापर्यंत अनेक मानांकने प्राप्त झाल्याने पालिकेला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

नवी मुंबई महापालिकेला केंद्र व राज्याकडून अनेक मानांकने

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने केलेल्या चांगल्या कामासाठी वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाकडून पालिकेला आतापर्यंत अनेक मानांकने प्राप्त झाल्याने पालिकेला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. पालिकेला ४३ कोटी इतकी भरीव रक्कम पारितोषिक स्वरूपात प्राप्त झाली आहे. हीच रक्कम पालिका शहराचा लौकिक आणखी उंचावण्यासाठी व सौंदर्यीकरणासाठी उपयोगात आणणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

नवी मुंबई हे देशातील स्वच्छ शहरांमध्ये मागील अनेक वर्षांपासून आपले चांगले स्थान टिकवून आहे. नवी मुंबई शहरात केंद्राकडून होणाऱ्या विविध देशपातळीवरील मानांकनांमध्ये तसेच राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध राज्य पातळीवरील स्पर्धामध्ये अनेक वर्षांपासून पालिकेचे वर्चस्व अबाधित  आहे. त्यामुळे देश व राज्य पातळीवरील होणाऱ्या विविध स्पर्धामधून भरीव रक्कम पारितोषिक स्वरूपात प्राप्त होते. त्यामुळे याच स्पर्धामधून तसेच पालिकेने मिळवलेल्यम मानांकनांमधून पालिकेला प्राप्त होणाऱ्या बक्षिसातून पालिकेच्या माध्यमातून शहराचे सौंदर्यवाढीसाठी पालिका सातत्याने परत करत असते.

नुकत्याच झालेल्या पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पालिकेला विविध पारितोषिकांमधून ४३ कोटी एवढी भरघोस रक्कम पालिकेस मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या याच बक्षीस रकमेतून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. माझी वसुंधराअंतर्गत उद्याने व ग्रीनबेल्ट बनवणे तसेच प्रदूषणविरहित उपक्रमासाठी इलेक्ट्रिक बस तसेच सफाईमित्र पुरस्कारामधून उद्याने अशा विविध गोष्टी केल्या जाणार आहेत. पालिका आयुक्तांनी सायन पनवेल मार्गावरील दिवाबत्ती सुविधा पालिकेकडे घेतली असून आगामी काळात या मार्गावरील पदपथ व दुभाजक यांचे व महामार्ग स्वच्छतेचे काम करण्यात येणार आहे.

राज्यात स्वच्छता अभियान स्पर्धामध्ये सुरुवातीची सलग अनेक वर्षे  नवी मुंबई महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे पालिकेने बक्षीसरूपातून मिळालेल्या रकमेतून पालिका आयुक्त बंगल्याच्या पाठीमागे रॉक गार्डन अर्थात संत गाडगेबाबा उद्यान विकसित केले आहे.  नवी मुंबई शहराला सातत्याने राज्य व देशपातळीवरील सन्मान प्राप्त झाले असून त्यातून उद्याने तसेच स्वच्छता अभियानाअंतर्गत अनेक कामे करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी दिली.

शहराला अनेक मानांकने

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये  मोठय़ा शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई शहराने मिळवला. तसेच कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार मानांकन व हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील ओडिफ वॉटरप्लस हे सर्वोच्च मानांकन मिळणाऱ्या देशातील ९ शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. तसेच सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात देशातील द्वितीय क्रमांकाचे मानांकित शहर ठरले आहे. त्याचप्रमाणे प्रथमच नव्याने समाविष्ट झालेल्या प्रेरक दौड सन्मान विभागामध्येही सर्वोच्च दिव्य मानांकन प्राप्त झालेले आहे.  तर महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचे शहर ठरले आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम

एकीकडे नवी मुंबई शहराला विविध मानांकनांमध्ये नवी मुंबईकरांचा सक्रिय सहभाग स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नियमित श्रम याचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. सध्या नवी मुंबईत जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चित्रिभतींमधून शहराला आकर्षक व आणखी देखणे रूप प्राप्त झाले आहे. नवी मुंबई शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग व त्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिका आग्रही आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून पारितोषिक प्राप्त झाल्यानंतर शासनाकडूनच कोणत्या कामासाठी ही रक्कम वापरावी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.

देशात व राज्यात होणाऱ्या  विविध स्पर्धात नवी मुंबई महापालिकेचा दबदबा असून शहरात राबवलेल्या चांगल्या कामांमुळेच अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून जास्तीत जास्त बक्षीस ही रक्कम शहर सौंदर्यीकरण व सायन पनवेल हद्दीच्या सौंदर्यीकरणासाठी वापरली जाणार आहे. पालिकेच्या प्रत्येक यशात प्रशासनाबरोबरच नवी मुंबईकर नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Beautification standards navi mumbai municipal corporation central and state ysh

ताज्या बातम्या