Speeding Scorpio accident in Belapur Navi Mumbai leaves locals in shock after CCTV footage surfaces : अलिशान गाड्या बेदरकारपणे चालवून सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. आता नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर ८ परिसरातही असाच धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर ८ परिसरात भरधाव स्कॉर्पिओ कारने पदपथावर चालणाऱ्या तरुणीला चिरडले. या घटनेत १९ वर्षीय तरुण गाडी चालवत असताना नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी, रिक्षा तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही कारचेही नुकसान झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून बेलापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अपघात कसा घडला?

एक तरुणी फुटपाथच्या खालून रस्त्याच्या कडेला चालत होती. तेवढ्यात मागून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगात आली. या वाहनाचे नियंत्रण आधीच सुटले त्यामुळे तरुणीला काही कळायच्या आतच या स्कॉर्पिओ गाडीने तरुणीला उडवलं अन् गाडी थेट फुटपाथवर चढली. त्याच वेगात ती गाडी पुढे गेली आणि पुढे उभ्या असलेल्या रिक्षा व गाड्यांना धडकली. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून नागरिकांच्या सुरक्षेकरता असलेले फुटपाथही आता सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या बेलापूरमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी कार चालक आणि त्याच्या मित्राविरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.