सोमवार (१७ ऑक्टोबर) पासून नवी मुंबईतील बेलापूर ते जेएनपीटी बंदर या समुद्री मार्गावर जलद प्रवासाकरीता वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. या जलसेवेमुळे प्रवाशांना नवी मुंबई ते उरण हा प्रवास अवघ्या १५ मिनिटात करता येणार आहे. या सेवेमुळे विना अडथळा नवी मुंबईतून उरणला व उरणवरून नवी मुंबईत पोहचता येणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत रिक्षांच्या रांगा, मीटर प्रमाणीकरणासाठी प्रतिक्षा

या आरामदायी व वातानुकूलित प्रवासासाठी एकेरी फेरीला ३०० रुपये ते परतीच्या दुहेरी प्रवासा करीता ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे बेलापूर सकाळी ८.३०,१०.३०,१२.३०,२.३०.४.३०, व ६.३० तर जेएनपीटी वरून सकाळी ९.१५, ११.१५, १.१५, ३.१५, ५.१५ व ७.१५ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. या सेवेसाठी मासिक पासची ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये एकूण ६० एकेरी फेरीसाठी दरमहा ६ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. या पासची संख्या मर्यादित असून केवळ २५० पास उपलब्ध आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : आगामी स्वच्छता सर्वेक्षणात रेल्वे स्थानक, शिव- पनवेल महामार्गाचे सुशोभिकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय

सेवा परवडणारी नाही

समुद्री मार्गाने सुरू होणारी बेलापूर ते जेएनपीटी दरम्यानची जलसेवा ही सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी नसल्याच्या प्रतिक्रिया उरणमधील प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. कारण रस्ता रुंदीकरणामुळे सध्या खाजगी वाहनाने उरण ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या वीस मिनिटात करता येत आहे. त्यासाठी एवढी रक्कम का मोजावी. तसेच बेलापूरवरून व जेएनपीटी जेट्टीपर्यंतचा प्रवास कसा करावा ही समस्या निर्माण होणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबईतील पोलीसांच चाललंय तरी काय…पोलीस दलाच्या मोटार परिवहन वाहन विभागातील लाखोंचा गैरव्यवहार उघड

यापूर्वीची हावर क्राफ्ट सेवा बंद

काही वर्षांपूर्वी याच जलमार्गावर वाशी, जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया अशी हावर क्राफ्ट सेवा सुरू केली होती. ही सेवा न परवडणारी असल्याने ती काही दिवसातच बंद करावी लागली होती. त्यामुळे नव्याने सुरू होत असलेली वॉटर टॅक्सी सेवेला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो ते पहावे लागणार आहे.