नवी मुंबई : महावितरणने सीबीडी बेलापूर आणि उलवे परिसरात केलेल्या तपासणी मोहिमेत ऑगस्ट महिन्यात ७६ लाख ८५ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. सीबीडी बेलापूर उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील २२ प्रकरणांमध्ये तब्बल १ लाख ९० हजार ७५७ युनिट वीजेचा अनधिकृत वापर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये फेरफार करण्याबरोबरच मीटरच्या नोंदीवर परिणाम करणाऱ्या पद्धती वापरल्या जात असल्याचे कारवाईतून उघड झाले. काही प्रकरणांत मीटरमध्ये प्रतिरोधक बसविण्यात आले होते. काही ठिकाणी मीटरला बगल देऊन वीज वापरण्यात आली, तर सर्व्हिस वायरला थेट जोड देऊन वीजचोरी केल्याची प्रकरणेही आढळली. त्यामुळे प्रत्यक्ष वापरलेल्या वीजेची पूर्ण नोंद मीटरमध्ये होऊ नये, यासाठी विविध मार्गांचा अवलंब केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्या आदेशानुसार परिमंडलातील विविध उपविभागांमध्ये वीजचोरीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सीबीडी बेलापूर उपविभागातील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यातील तपासणीत २२ प्रकरणे उघडकीस आली. या सर्व प्रकरणांत वीज कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
उलवेत दोन मोठी प्रकरणे
उलवे परिसरातील दोन प्रकरणेही मोठी ठरली. एका प्रकरणात ५१ लाख ४१ हजार रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात ११ लाख ८४ हजार रुपयांची वीजचोरी आढळली. संबंधित ग्राहकांकडून वीजचोरीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. मात्र उर्वरित प्रकरणांमध्ये वीजचोरीची रक्कम किती होती, याचा स्वतंत्र तपशील महावितरणने दिलेला नाही.
तपासणी पथकाकडून जोडण्यांची पाहणी
वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास बेडगकर आणि सीबीडी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत बाणाईत यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान वीजमीटर, जोडणी तसेच सर्व्हिस वायरची पाहणी करण्यात आली. संशयास्पद बाबी आढळल्यानंतर संबंधित जोडण्यांची सखोल तपासणी करण्यात आली.
दंडाची रक्कम न भरल्यास गुन्हा
वीजचोरी आढळल्यानंतर संबंधित ग्राहकांवर वीज कायद्यानुसार कारवाई केली जाते. वीजचोरीची निश्चित रक्कम, वीजबिल आणि दंडाची रक्कम विहित मुदतीत न भरल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वीजचोरी करून कारवाई टाळता येणार नाही, असा इशारा महावितरणने दिला आहे.
मीटरमध्ये फेरफार, मीटरला बगल देणे, सर्व्हिस वायरला जोड देणे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ग्राहकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अधिकृत जोडणीद्वारे वीज वापरावी आणि वीजचोरीस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. – संजय पाटील, मुख्य अभियंता, महावितरण बेलापूर
