उरण : आमचा पक्ष,चिन्ह आमदार, खासदार चोरल्याने कार्यकर्ते गळत गात्र झाले होते. मात्र १४०० कोटींच्या राम मंदीर दान, देणग्या चोरणाऱ्या भाजपा मुळे पक्षाला पुन्हा नवसंजीवनी मिळाल्याचे मत शुक्रवारी उरणच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहर शाखेच्या वतीने राम मंदीर सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणवंत व साहित्य वाटप कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. यावेळी आता श्रीरामच भाजपच्या अहंकारी सत्तेचा अंत करतील असे मत विधानसभा गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. शिवसेनेचे खासदार,आमदार चोरल्यानंतर भाजपने प्रभु श्रीराम मंदिराच्या दान, देणग्यांवरही डल्ला मारला. १४०० कोटींच्या सोने, चांदी चोरणाऱ्या भाजप भोवती पापाचा फास आवळला आहे.त्यामुळे भाजपचा प्रभु रामचंद्रच अंत करतील असे भाकीत शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट ) विधानसभेतील गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.

उरण शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी

सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून केलेल्या लोकापयोगी कामांची आठवण करून दिली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली.न्याय मागण्यांसाठी जंतरमंतरवर उपोषण करणाऱ्या लाखो निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार,अश्रुधुर,पॅलटगनचा वापर केला.त्यामुळे देशभरातील जनतेमध्ये भाजपविरोधी असंतोषाचा भडका उडाला.उद्रेक उफाळून आला.यावेळी भास्कर जाधव यांनी स्थानिक भाजप आमदार महेश बालदी यांच्यावरही टीका करताना पावसाळी विधानसभा सभागृहात घडलेल्या घटनेचा उल्लेख केला.आमदार बालदी यांच्या बालेकिल्ल्यातच उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मविआने सुरूंग लावून नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक निवडून आणले.भ्रष्टाचार,देशभरातील जनतेमध्ये खदखदत असलेल्या असंतोषामुळे भाजप विरोधात फास आवळला जात आहे.यामुळे शाखाप्रमुखांनी कार्यरत , सज्ज व्हा आणि कामाला लागा असे आवाहनही जाधव यांनी केले.

यावेळी माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी उनपच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार महेश बालदी यांनी नगराध्यक्षांसह मविआचा २१-० असा पराभव करण्याची भीम गर्जना केली होती.मात्र मतदारांच्या विश्वासाच्या जोरावर मविआने २१ पैकी नगराध्यक्षांसह १० जागा जिंकून आमदारांचे चांगलेच गर्वहरण केल्याची टीका केली.मनोहर भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश मिळविण्यासाठी परिश्रम, मेहनत करण्याचे आवाहन केले.

यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअर निवडताना पालकांनीही पाल्यांच्या सर्वच बाबींचा विचार करून काळजी घेण्याचे आवाहन केले.२० राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेने उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या उमेदवारांचे अभिनंदन करताना जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांनी भाजपवर टिका करताना वाढत्या भ्रष्टाचारामुळे आता भाजपला झुरळांचीही भीती वाटते आहे.शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या भाजपवर टिकेचा प्रहार करताना कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू कैक पटीने चांगला असल्याचे खडेबोलही सुनावले.विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप, ज्येष्ठांचा आदर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रमाचा शिवसेनेने सुरू केलेला महायज्ञ मागील ४० वर्षांपासून अखंडपणे सुरूच ठेवण्यात आला असल्याचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रास्ताविकेतुन सांगितले.नूकत्याच पार पडलेल्या उनप, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करुन नुसत्याच बढाया मारणाऱ्या आमदार महेश बालदी यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.सत्ता असतानाही भाजपला मागील १२ वर्षांपासून उनपचे राजीव गांधी सभागृहाचे काम पूर्ण करताना आलेले नाही. बायपास रस्त्यांचे कामही रखडले आहे असल्याची चौफेर टीका उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी भाषणातून केली.

याप्रसंगी उरण नगरपरिषद,उरण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना (उध्दव ठाकरे गट) नगरसेवक व पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आली.यावेळीव्यासपीठावर माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा पाटील,उरण पंचायत समितीचे उपसभापती परेश ठाकूर, सदस्य दिपक भोईर,सदस्या कविता पाटील, नगरसेवक गटनेते अतुल ठाकुर, विक्रम म्हात्रे, अमित म्हात्रे,उनप सदस्या वंदना पवार, प्रमिला पवार,मंगेश कासारे,नाहिदा ठाकूर, प्रार्थना म्हात्रे, तनिषा पाटील,शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभेतील आ. महेश बालदी आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद : पावसाळी अधिवेशनात चर्चेच्या दरम्यान विधानसभेत भास्कर जाधव आणि उरणचे आ. महेश बालदी यांच्या बाचाबाची झाली होती. या पार्श्वभूमीवर जाधव काय बोलणार हे ऐकण्यासाठी उरणच्या नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.