मागील वर्षी मार्च ते डिसेंबपर्यंत ७८ लाखांचा महसूल जमा

विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या नूतनीकरणात १० ते ११ महिने बंद राहिल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमांतून महापालिकेला मिळणारा लाखोंचा महसूल बुडाला आहे. गेल्या वर्षी  सुमारे ७८ लाखांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला होता.

नवी मुंबई शहारात कला रसिकांच्या मनोरंजनासाठी सध्या वाशी परिसरात एकमेव व नामांकित असे विष्णुदास भावे नाटय़गृह उपलब्ध आहे. मात्र मार्च २०१९ पासून नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यामध्ये वाहनतळ व्यवस्थेचे नियोजन करणे, स्थापत्य कामे, प्रेक्षागृहातील नवीन खुच्र्या बसविणे, नाटय़गृहामधील कलावंत विश्रांती कक्ष व खोल्या त्याचबरोबर कार्यालयाचे नूतनीकरण, अग्निशमन यंत्रणा बसविणे, अपंग व्यक्तींसाठी ‘बॅरिअर फ्री’ प्रवेश व्यवस्था, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविणे, संरक्षक भिंतीची सुधारणा करणे, अद्ययावत प्रकाशयोजना व्यवस्था करणे, वातानुकूलित व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, ध्वनी व प्रकाशयोजना नियंत्रण यंत्रणा बसविणे, कॉस्टिकविषयक कामे करणे, विद्युत, ध्वनी व प्रकाशयोजना आदी कामे करण्यात येत आहेत. हे नाटय़गृह १९ नोव्हेंबपर्यंत नागरिकांकरिता खुले करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त कामाचे आदेश दिले असून यामध्ये बाहेरील नूतनीकरण, वाहनतळ व्यवस्थेत बदल आदी कामांचा समावेश आहे. वाढीव काम निघाल्याने  नाटय़गृह आता जानेवारी महिन्यात नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

मार्च ते डिसेंबर या कालावधीत बऱ्याच सार्वजनिक सुट्टय़ा असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी ख्रिसमस इत्यादी सणासुदीच्या सुट्टय़ा असतात. या सुट्टय़ांमध्ये बरेच नाटय़रसिक मनोरंजनासाठी नाटकांना पसंती देत असतात. तसेच या कालावधीत बरेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम, दिवाळी पहाटचे कार्यक्रम देखील या नाटय़गृहात आयोजित केले जातात. मात्र यंदा त्याचा आस्वाद घेता न आल्याने निराशा झालेली आहे.

१० वर्षांनंतर नूतनीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २००८ मध्ये नाटय़गृहाच्या दुरुस्तीसाठी कमी कालावधीसाठी नाटय़गृह बंद ठेवण्यात आले होते. या दुरुस्तीमध्ये नाटय़गृहाची आसनव्यवस्था बदलण्यात आली होती, मात्र सन २००८ नंतर २०१९ मध्ये पुन्हा नव्याने नाटय़गृहाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात येत असून हे दीर्घकाळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडाला आहे. मागील वर्षी मार्च २०१८ ते डिसेंबर २०१८  या कालावधीत नाटय़गृहात मनोरंजनात्मक कार्यक्रमातून ७८ लाख २० हजार रुपये महसूल प्राप्त झाला होता. मात्र यावर्षी या कालावधीत हे नाटय़गृह पूर्णता बंद असल्याने पालिकेला यातून मिळणारा महसूल मात्र बुडाला आहे.