scorecardresearch

नवी मुंबई सेझकडून भेंडखळ पाणथळीत भराव;पाणथळ पूर्णपणे बुजवून टाकल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा, न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष

सुमारे १६५ एकर भेंडखळ पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्याचे आदेश उच्च न्यायालय नियुक्त पाणथळ समितीने देऊनही नवी मुंबई सेझने विकासाच्या नावाखाली ही पाणथळ पूर्णपणे बुजवून टाकल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

(डिसेंबर २०१९ आणि आताची भेंडखळ स्थिती.)

उरण : सुमारे १६५ एकर भेंडखळ पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्याचे आदेश उच्च न्यायालय नियुक्त पाणथळ समितीने देऊनही नवी मुंबई सेझने विकासाच्या नावाखाली ही पाणथळ पूर्णपणे बुजवून टाकल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांचा काळ होता. तेव्हापासून पाणथळीच्या विनाशाची सुरुवात झाली. या क्षेत्रात राडारोडा टाकण्याचे प्रकार घडू लागल्याने त्याविषयीची तक्रार पर्यावरणस्नेही नाटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठानने केली. त्यानंतर उच्च न्यायालय नियुक्त समितीच्या आदेशावरून या प्रकाराला अटकाव करण्यात आला.
त्याचप्रमाणे डिसेंबर २०१९ दरम्यान या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सिडको, रायगड जिल्हा प्रशासन आणि नवी मुंबई सेझला दिले. जानेवारी २०२० पर्यंत जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक बुजवण्यात आलेल्या पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, आपण हे क्षेत्र एका बडय़ा कंपनीला सुपूर्द केल्याची माहिती देत सिडकोने हात वर केल्याचे कुमार यांनी सांगितले. या वेळी सिडकोने कंपनीचे नावही नमूद केले. या संपूर्ण प्रकाराचा तपास महसूल-वन विभागांनी एकत्रित करण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाने अनोळखी नवी मुंबई सेझ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एफआयआरही नोंदवला.
नवी मुंबईतील बेलपाडा, पाणजे या एनआरआय-टीएस चाणक्यच्या जुळय़ा पाणथळीसह भेंडखळ आणि ईशान्य मुंबईचे भांडुप क्षेत्र मिळून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य (टीसीएफएस)चा भाग तयार होतो असे सॅटेलाइट वेटलँड मॅनेजमेंट प्लानमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीकडे नाटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी लक्ष वेधले. हा आराखडा इतर कोणी नव्हे तर राज्य वन विभागाच्या वतीने तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याकडून रामसर पाणथळ दर्जाचा हिरिरीने प्रचार करण्यात येतो आहे. पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नाचा हा भाग असून या उपक्रमात भारतही सक्रिय आहे.
आम्ही यासबंधी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असून जैवविविधतेच्या बाबतीत समृद्ध असलेल्या आणखी एका क्षेत्राचा विनाश पायाभूत विकासाच्या नावावर सुरू आहे, हे पाहताना खेद वाटतो. या क्षेत्राचे संवर्धन करण्याची विनंती राज्य शासन आणि उच्च न्यायालय नियुक्त समितीकडे केली आहे. – बी एन कुमार, संचालक नाटकनेक्ट फाऊंडेशन

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhendkhal navi mumbai sez environmentalists claim wetland completely destroyed ignoring court order thane flamingo sanctuary amy