scorecardresearch

सिडकोविरोधात १७ मार्च रोजी भूमिपुत्र एकवटणार

सिडकोच्या ५२ व्या वर्धापनदिनीच (१७ मार्च ) या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८४ च्या संघर्षांची भूमी असलेल्या उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे रास्ता रोको करून काळा दिवस पाळण्यात येणार आहे.

सर्वपक्षीय कृती समितीतर्फे पुन्हा एकदा दास्तान (जासई) येथे  ‘रास्ता रोको’

उरण :  सिडकोच्या ५२ व्या वर्धापनदिनीच (१७ मार्च ) या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८४ च्या संघर्षांची भूमी असलेल्या उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे रास्ता रोको करून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या रूपरेषा ठरविण्यासाठी आगरी समाज मंडळाच्या सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक रविवारी पडली. समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. मुंबईवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई निर्मितीसाठी सिडकोची स्थापना झाली.सिडकोने शासनाच्या माध्यमातून पनवेल-उरण बेलापूर पट्टीतील ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन शेतकऱ्यांना भूमिहीन केले.

जमिनी संपादन करताना सिडकोने शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासने दिली होती. मात्र शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे सिडकोला ५२ वर्षांनंतरही शक्य झालेले नाही. त्यामुळे ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांना विविध प्रलंबित मागण्या व न्याय्य हक्कांसाठी ५२ वर्षे उलटल्यानंतरही संघर्ष करावा लागत आहे.   दुर्दैव म्हणजे दास्तान फाटा येथे १९८४ मध्ये सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात लढय़ाचे रणिशग फुंकले होते. मात्र जासई पट्टय़ातील शेतकऱ्यांना अद्यापही साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळालेले नाहीत.  सिडकोच्या या आडमुठेपणाचा जाब विचारण्यासाठी १७ मार्च रोजी सिडकोच्या वर्धापनदिनीच कृती समितीच्या वतीने ९५ गावच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठी जासई येथील दास्तान फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहेत.

या रास्ता रोको आंदोलनात सिडकोपीडित हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस समितीचे कार्याध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, सरचिटणीस भूषण पाटील, जे. डी. तांडेल, सहसचिव संतोष केणे, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, मनोहर पाटील, राजेश गायकर, विजय गायकर, अतुल पाटील, कमलाकर पवार, संजय घरत, हितेश गोवारी, सुनील पाटील, मोरेश्वर पाटील, नंदेश ठाकूर आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhumiputra unite against cidco demand movement ysh

ताज्या बातम्या