कल्याण ते तळोजा औद्योगिक वसाहतीच्या मार्गावर मंगळवारी पहाटे एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. समीर तानाजी पाटील असे त्या मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो उसाटणे गावचा रहिवासी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांंनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन’; भाजपाचा सिडको मंडळाला इशारा

शेतकऱ्यांनी रोखले रस्त्याच्या दुरुस्तीचे काम

समीर हा नवी मुंबईत काम करत होता. समीर कामावरुन घरी येत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्याचा अपघात झाला आणि या अपघातात त्याचा जीव गेला. गेल्या ३८ वर्षांपासून कल्याण तळोजा मार्गाच्या दुरुस्तीचे काम स्थानिक शेतकऱ्यांनी रोखलं आहे. हा मार्ग ज्या शेतक-यांच्या जमिनीवर बांधलाय त्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने शेतक-यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे अगोदर योग्य जमिनीचा मोबदला द्या त्यानंतरच मार्गाची दुरुस्ती हाती घ्या, असा पवित्रा घेतल्याने या रस्त्याची डागडुजी होऊ शकली नाही. औद्योगिक विकास महामंडळातील सचिवालयातील अधिका-यांना या संदर्भात तोडगा काढण्यासाठी वेळ नसल्याने मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम थांबले आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूक पोलिसांनी श्रमदान करुन आणि अनेक ठेकेदारांकडून साहित्य घेऊन येथील खड्डे बुजविले होते. येथील खड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीने होते तर अनेकदा वाहतूक कोंडीत हा मार्ग अडकलेला दिसतो.

हेही वाचा- लोकलच्या डब्यात आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे समीरला गमवावा लागला जीव

समीरप्रमाणे या मार्गावरील खड्यामुळे दोन पोलिसांचे वेगवेगळ्या अपघातांमध्ये जीव गेले आहेत. समीरची दुचाकी खड्यातून रस्त्याच्याकडेला गेली. त्यानंतर पुन्हा रस्त्यावर येण्यासाठी तो दुचाकीव्दारे प्रयत्न करीत असताना त्याचा तोल गेला आणि त्याची दुचाकी मार्गाच्या एका बाजूला फेकली गेली तर समीर मार्गावर पडला. या दरम्यान जखमीच्या अंगावरुन अवजड वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघात नेमका कधी झाला याची वेळ पोलिसांना समजू शकली नाही. मात्र, पहाटे सहा वाजल्यानंतर या मार्गावरुन ये-जा करणा-या वाहनचालकांनी तळोजा पोलीसांनी या अपघाताची माहिती दिली. सकाळी सात वाजता समीरचे शव रुग्णवाहिकेतून पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले. समीरच्या जखमी शरीरावर नेमकी किती वाहने गेली याचा सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळासाहेब शिंदे शोध घेत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : रस्त्यावरील वाहनांच्या प्रकाशानंतर होतोय पथदिव्यांचा झगमगाट….

शेतकऱ्यांना लवकर मोबदला देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तळोजा कल्याण मार्ग बांधून २५ हून अधिक वर्षे उलटली तरी या मार्गावर औद्योगिक विकास महामंडळाने विजेचे पथदिवे लावले नाहीत. पावसाळ्यात खड्यामुळे मार्गावर साचलेल्या पाण्यातून रस्ता शोधावा लागतो. मात्र, त्यावेळेस मार्गावर अंधार पसरलेला असतो. तळोजा कल्याण हा मार्ग अंधारमय व खड्डेमय झाल्याने या जिवघेणा मार्गावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालावे. शेतक-यांची भूसंपादनाची नूकसान भरपाई, मार्गाचे रुंदीकरण आणि दुरुस्ती व पथदिव्यांची सोय केल्यास कल्याण, अंबरनाथ ते तळोजा मार्गे जेएनपीटी बंदर हा मार्ग गतीमान होईल, अशी मागणी भाजपचे तोंडरे गावातील युवा नेते महेश पाटील यांनी केली आहे. यापूर्वी शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिका-यांकडे शेतक-यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी हा पेच सोडविण्यासाठी व मार्गाची पाहणी करण्यासाठी याच मार्गाला भेट देणार आहेत. मात्र, त्या पाहणी दौ-याचा मुहूर्त ठरला नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike rider dies on accident due to stones on kalyan taloja road dpj
First published on: 20-09-2022 at 20:20 IST