उरणच्या १८ ग्रामपंचायतींवर शेकाप आघाडीचा वरचष्मा

उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर शेकाप आघाडीने सर्वाधिक सरपंचपदे जिंकल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे उरण विधानसभेतील सेनेच्या आमदारांना मात्र त्यांच्याच गावात एका नवख्या तरुणाने शेकापच्या सहकार्याने धोबीपछाड दिला आहे. तर भाजपनेदेखील काही ग्रामपंचायती प्रथमच ताब्यात घेतल्या आहेत.

उरणच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिवाळीपूर्वीच मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाले होते. या निवडणुकीत लाखो रुपयांची खैरात वाटण्यात आली. प्रत्येक मतासाठी पाच हजारांपर्यंतच्या रक्कम वाटण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. अशा परिस्थितीतही अनेक ग्रामपंचायतींमध्ये पक्षाने दिलेल्या आघाडी किंवा युतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढलेल्यांना मतदारांनी विजयी केले आहे.

संमिश्र निकालांमुळे कसरत

नवीन शेवे हे उरण विधानसभेचे शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांचे गाव आहे. या गावावर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना, भाजप व काँग्रेस हे एकत्र आले होते. मात्र शेकाप पुरस्कृत निशांत घरत या तरुणाने यास विरोध केल्याने तिन्ही पक्षांविरोधात लढविलेल्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत शेकाप पुरस्कृत उमेदवाराला मतदारांनी कौल दिल्याने शिवसेना आमदारांच्या वर्चस्वाला हा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच एका पक्षाचा तर बहुमत दुसरा पक्ष किंवा आघाडीकडे असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालविताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

सरपंचपदासाठीचे निकाल खालीलप्रमाणे

घारापुरी – बळीराम पद्माकर ठाकूर, सारडे – चंद्रशेखर छगन पाटील, भेंडखळ – भागश्री दशरथ चव्हाण, धुतूम – रेश्मा शरद ठाकूर, जीवन रोहिदास गावंड, पुनाडे – नीलम हरेश्वर ठाकूर, डोंगरी -नीलेश नरेश घरत, रानसई – गीता अनिल भगत, बोकडवीरा – मानसी देवेंद्र पाटील, चिर्ले – प्रियांका दीपक मढवी, पागोटे – भार्गव दामाजी पाटील, करळ – विश्वास बाळाराम तांडेल, जसखार – दामोदर जनार्दन घरत, कळंबुसरे – नूतन कुलदीप नाईक, नवघर – आरती मंगेश चौगले, पिरकोन – रमाकांत कृष्णा जोशी, पाणजे – करिश्मा हरेश भोईर, नवीन शेवे – निशांत विष्णू घरत हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत.

पनवेलमधील ११ पैकी ५ ग्रामपंचायतींवर शेकापची सत्ता

पनवेल : ग्रामीण पनवेलमधील आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या शेकापला ११ पैकी ५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राखण्यात यश मिळाले असून गेल्या अनेक वर्षांपासून ताब्यात असलेली चिंध्रण व शिरढोण येथील सत्ता राखण्यात शेकाप अपयशी ठरला आहे. या ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले असून शिवकर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा निर्णय चिठ्ठी उडवून झाल्याने या ठिकाणी मात्र भाजपचा निसटता पराभव झाला आहे.

पनवेल पालिकेच्या निवडणुकांतील यशानंतर तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पाडल्या. सरपंचपदासाठी स्वतंत्र निवडणूक होण्याची पनवेलमधील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील वर्चस्वासाठी शेकाप आणि भाजप यांच्यातील ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. शेकापला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ देशेकर व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रामदास शेवाळे या दोघांचा वापर आमदार प्रशांत ठाकूर यांनी योग्यपणे केल्याने शेकापला अपेक्षित यश मिळाले नसल्याची चर्चा आहे. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या गावाशेजारील केळवणे ग्रामपंचायतीवर १३ सदस्यांपैकी भाजपला ८, तर शिवसेनेचे ४ सदस्य निवडूण आले आहेत. याठिकाणी शेकापचा अवघा एक सदस्य निवडून आला आहे. तर दिघाटी ग्रामपंचायतीमध्ये ७ पैकी काँग्रेसचे दोन व शेकापचे पाच सदस्य निवडून आले आहेत. भाताणमध्ये ७ पैकी शेकाप २, काँग्रेस १, भाजप ३, शिवसेना १ असे सदस्य निवडून आले असून सरपंच शेकाप पक्षाचा आहे. तर नेरे ग्रामपंचायतीमधील ११ सदस्यांमध्ये भाजपचे ३, काँग्रेस १,  शेकाप ६, राष्ट्रवादीचा १ सदस्य निवडून आला असून या ग्रामपंचायतीचे सरपंचपद भाजपकडे आहे. चिंध्रण गावातील ९ सदस्यांपैकी भाजपचे ६, शिवसेना १, शेकाप २ सदस्य आहेत. अशीच विजयाची घोडदौड कानपोली ग्रामपंचायतीमध्ये राखत ७ पैकी भाजपचे ३ तर काँग्रेस व शेकापचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले आहेत.  शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये मात्र अनपेक्षित निकाल लागला असून ११ सदस्यांपैकी भाजपचे ७, शिवसेना १ व शेकापचे फक्त ३ सदस्य निवडून आले आहेत.

अपक्ष वरचढ

नितळस ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध करण्यासाठी विकास आघाडी स्थापन करून ९ सदस्यांपैकी शेकापचे पाच व भाजपचे चार सदस्य येथे बिनविरोध होते. मात्र विकास आघाडीविरोधात अपक्ष सरस ठरल्याचे समजते.

शिवकर ग्रामपंचायत नशीबाने शेकापकडे

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या काँग्रेसमधून भाजप प्रवेशानंतर शिवकर ग्रामपंचायत भाजपच्या वाटेला येणार असल्याची चिन्हे होती. मात्र मंगळवारी सरपंच पदाच्या निवडणूकीत अंतिम उमेदवाराला समान मते मिळाल्याने चिठ्ठी उडवून सरपंचपदाची निवड करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. या ग्रामपंचायतीवर ९ पैकी सहा सदस्य जरी भाजपचे असले तरी नशीबाने या ग्रामपंचायतींचे सरपंचपद शेकापला मिळाले आहे.