पनवेल : पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या निवडणूक आरक्षणाच्या सोडतीवेळी भाजप नेते आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची अनुपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. या सोडतीदरम्यान ठाकूर यंदाच्या पालिका निवडणुकीतील उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याची चर्चा पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली. व्यावसायिक कारणास्तव निवडणूक लढविणार नसल्याची पुष्टी स्वतः ठाकूर यांनी दिली आहे.
२०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधून ठाकूर यांनी सर्वाधिक म्हणजे ११,२९९ मते मिळवत ७,८४४ मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांच्या गैरहजेरीमुळे त्या प्रभागातील मतदारांमध्ये आणि भाजप पदाधिका-यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. मात्र याउलट काही भाजपच्या पदाधिका-यांमध्ये ठाकूर यांची जागा मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. ठाकूर कुटुबियांशी असलेली एकनिष्ठता दाखविण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरू झालेत. ठाकूर यांच्या या निर्णयामुळे या प्रभागातीलदा मतदारही नाराज झाले आहेत. ठाकूर हे प्रभाग १९ मधील उमेदवार असल्याने या प्रभागात विशेष लक्ष्य दिले जात होते.
ठाकूर कुटुबियांनी नगराध्यक्ष पद, खासदार, चारवेळआ आमदार आणि पालिकेचे सभागृह पद अशी विविध पदांची जबाबदारी पार पाडली आहे. दरम्यान, पनवेल विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक ६,७८,९८१ मतदार असलेला असल्याने पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून नव्याने तयार होणाऱ्या मतदारसंघात परेश ठाकूर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी राजकीय चर्चा सध्या पनवेलमध्ये रंगली आहे.
