नवी मुंबई : करोनामुळे लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रकिया सुरू झाली असून यासाठी अतिशय महत्त्वाची असलेली प्रभाग रचना मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यात अनेक प्रभागांची मोडतोड व फोडाफोड झाल्याने अनेकांची राजकीय कोंडी झाली आहे तर काहींना ती पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे दिवसभरात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी आक्षेप घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर मंदा म्हात्रे यांनी विकासकामे उत्तर देतील, असे आवाहन दिले आहे. काँग्रेसने नाईकांच्या काळातच प्रभागांची मोडतोड झाली होती. आता उलट नियमानुसार रचना झाल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी सावध पवित्रा घेत अभ्यासाअंती मत व्यक्त करणे उचित ठरेल, असे सांगितले.

महापालिका प्रशासनाकडून मात्र प्रभागरचना करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सर्व नियमावलींचे पालन करून प्रभागरचना करण्यात आल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. आयोगाने लोकसंख्येनुसार एका प्रभागातील सरासरी लोकसंख्या काढून नियमानुसार प्रभागरचना केली आहे. त्यात हरकती व सूचना घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सूचना हरकती सुनावणीनंतरच निवडणूक आयोग प्रभागरचनेला अंतिम मंजुरी देईल, असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.

महापालिका अधिकाऱ्यांनी केलेले हे पाप आहे. कोणाच्या दबावाखाली केले हा विषय संशोधनाचा आहे. प्रभाग रचना अतिशय चुकीची करण्यात आलेली आहे. प्रभागातील लोकसंख्येत दोन ते चार हजारांचा फरक समजू शकतो, मात्र आठ ते दहा हजारांचा फरक करण्यात आला आहे. याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.

– गणेश नाईक, आमदार,  भाजप

कितीही तोडफोड, फोडाफोडी झाली तरी बेलापूरमध्ये काहीही फरक पडणार नाही. प्रभाग रचनेवर नाही तर विकासकामांवर मते मागतो. परिस्थिती कशीही असो आम्ही लढण्यास तयार आहोत.

– मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर, भाजप

आजच प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. अजून पूर्ण अभ्यास झालेला नाही. याबाबत सर्वाशी चर्चा, विचारविनिमय केल्यावर प्रतिक्रिया देऊ शकेल. 

– विजय नाहटा, उपनेते, शिवसेना

प्रभाग रचना व्यवस्थित झालेली आहे. शंभर टक्के बिनचूक शक्य नाही. विचारपूर्वक, नियमानुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे. सत्तेत असताना गणेश नाईक यांनी स्वत:ला हवी तशी प्रभागरचना केली. आता तसे न होता पारदर्शक प्रभाग रचना झाली आहे. 

– अनिल कौशिक,  अध्यक्ष, काँग्रेस, नवी मुंबई</p>

आघाडीला सोयीची प्रभाग रचना करण्यात आली आहे. तरीही मनसे नक्कीच मुसंडी मारेल. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक िरगणात उतरणार आहोत. 

– गजानन काळे, अध्यक्ष, नवी मुंबई, मनसे

आमच्या मते प्रभाग रचना योग्य झालेली आहे. आम्ही यापूर्वीच सर्व प्रभागांत उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. प्रभाग रचनेत बदल झाले तरी काम करणाऱ्यांना काहीही फरक पडत नाही.

– श्यामभाऊ कदम, कार्यकारी अध्यक्ष, नवी मुंबई, आप

ज्यांना पालिकेने केलेली प्रभागरचना मान्य नाही त्यांनी न्यायालयात जावे. न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. 

– विठ्ठल मोरे,  शिवसेना, जिल्हाध्यक्ष

मी पूर्ण अजून पाहिलेले नाही. मात्र जेवढा अभ्यास केला त्यावरून मला असे वाटते की प्रत्येकाला आनंद वाटेल अशी प्रभाग रचना शक्य नाही. मात्र नियमानुसार होणे अपेक्षित आहे. 

– नामदेव भगत,  राष्ट्रवादी  काँग्रेस

प्रभाग रचना सदोष आहे. न्यायालयात गेले तरी काही फायदा होईल असे वाटत नाही. अगोदरच बहूसदस्य प्रभाग पद्धतीने छोटे पक्ष जेरीस आले आहेत. त्यात प्रभाग रचना अशी केली की आपला प्रभाग म्हणून जेथे काम केली त्याचीच तोडफोड केली आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे राजकीय अस्तित्व संपल आहे.

– सिद्राम ओव्हाळ, आरपीआय आठवले गट