नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या तेराव्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपने निवडीच्या आदल्या दिवशीच खास रणनीती राबवली आहे. पक्षाच्या सर्व ६५ नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकाला असे एकूण ६६ नगरसेवक अज्ञात स्थळी ठेवण्यात आले असून, मतदानापर्यंत सर्वांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संभाव्य राजकीय दबाव किंवा दगाफटका टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनपेक्षित उलटफेर होऊ नये, यासाठी पक्षाकडून ‘फ्लोअर मॅनेजमेंट’वर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळेच सर्व नगरसेवकांना एका ठिकाणी एकत्र ठेवून त्यांच्याशी संवाद, समन्वय आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी सुजाता पाटील, तर उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी सरोज पाटील आणि उपमहापौर पदासाठी आकाश मढवी हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ औपचारिकपणे न पाहता आपली राजकीय ताकद आजमावण्याची एक संधी म्हणून दोन्ही पक्षांकडून पाहिले जात आहे.

शिवसेनेनेही महापौर व उपमहापौर निवडीच्या मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मात्र महापालिकेतील संख्याबळ पाहता भाजपचाच उमेदवार महापौरपदी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही कोणताही धोका नको म्हणून भाजपाने नगरसेवकांना मतदानापर्यंत एकत्र ठेवण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या सकाळी सर्व ६६ नगरसेवक एकत्रितपणे थेट सभागृहात दाखल होऊन मतदान करतील. बहुमत असूनही घेतलेली ही खबरदारी आणि दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे नवी मुंबईतील ही महापौर निवडणूक राजकीयदृष्ट्या विशेष लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे शहरातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे.