उरण : भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ (BMS) ची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली. या बैठकीत देशातील विविध बंदरांमध्ये कार्यरत कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या उद्घाटनाची सुरुवात महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत राय यांच्या हस्ते BMS ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर महासंघाचे प्रभारी चंद्रकांत (अण्णा) धुमाळ, महासचिव सुरेश पाटील आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी एस. सुरेश, मुगास्वामी, आनंदकुमार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसीय बैठकीदरम्यान बंदर क्षेत्रातील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या वेतन, सेवा-सुविधा, कामाच्या परिस्थिती, कामगारांचे हक्क, सुरक्षा, कल्याण आणि भविष्यासंबंधी विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. देशातील प्रमुख बंदरांमधून आलेल्या BMS संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले अहवाल, समस्या व सूचना राष्ट्रीय कार्यकारिणीसमोर मांडल्या.

यावेळी प्रमुख बंदरांमधील सर्व नेत्यांनी VOC Port BMS Union च्या नवीन संघटनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल अभिनंदन केले आणि संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. समारोपाच्या सत्रात राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी कामगार संघटनेच्या एकतेचे आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “संघटनेपेक्षा कोणीही मोठे नाही. BMS ही केवळ ट्रेड युनियन नाही, तर कामगारांच्या सन्मानासाठी, कल्याणासाठी, स्वाभिमानासाठी आणि कामगारांच्या उन्नतीसाठी कार्य करणारी एक व्यापक कामगार चळवळ आहे. BMS चा कामगार केवळ उत्पादनासाठी काम करत नाही, तर राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान देतो.”

कामगारांची एकजूट, संघटनेची ताकद आणि कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस देशातील विविध बंदरांमधील BMS संघटनांचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये के. के. विजयन, गोपी पटनायक, सुधीर तिवरेकर, प्रभाकर उपरकर, विघ्नेश नायक, श्रेया शेलके, सौ. विशाखा मंजरेकर, राजलक्ष्मी, अमील चिरलेकर, संजय धांडोल तसेच इतर कार्यकारिणी सदस्यांचा समावेश होता. बैठकीचा समारोप कामगारांचे हक्क, सन्मान, स्वाभिमान आणि कल्याण यासाठी BMS ची चळवळ अधिक बळकट करण्याच्या निर्धाराने करण्यात आला.