नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या आकाराच्या मालवाहू विमानांची वर्दळ वाढत असताना सोमवारी (ता.२४) पहाटे नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७-४०० एफ विमान दाखल झाले. जर्मनीतील फ्रँकफर्ट-हान विमानतळावरून मालवाहतूक घेऊन आलेल्या या विमानाचे विमानतळावर जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे विमान ठरले आहे.
नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७-४०० एफ हे चार इंजिनांचे मालवाहू विमान आहे. मोठ्या आकाराचा आणि वजनदार माल वाहून नेण्यासाठी या प्रकारच्या विमानाचा वापर केला जातो. फ्रँकफर्ट-हान ते नवी मुंबई या थेट हवाई मार्गावरून हे विमान सोमवारी पहाटे नवी मुंबई विमानतळावर उतरले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यापूर्वी इंडिगो कार्गोचे एअरबस ए३२१ मालवाहू विमान, हाँगकाँग एअर कार्गोचे एअरबस ए३३०-२०० एफ आणि अफकॉम कार्गोचे बोईंग ७३७-८०० एफ ही मालवाहू विमाने दाखल झाली आहेत. त्यानंतर बोईंग ७४७च्या आगमनामुळे विमानतळावर हाताळण्यात आलेल्या मोठ्या मालवाहू विमानांच्या प्रकारात आणखी एका विमानाची भर पडली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मालवाहतूक सेवेत गेल्या काही आठवड्यांत वाढ झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय मार्गांवरून मालवाहू विमानांची ये-जा सुरू झाल्याने विमानतळाच्या कार्गो सेवेला चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बोईंग ७४७सारख्या मोठ्या मालवाहू विमानाचे आगमन महत्त्वाचे मानले जात आहे. विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवेत मोठ्या क्षमतेची विमाने हाताळण्याची क्षमता असल्याचेही या आगमनातून स्पष्ट झाले आहे.
