नवी मुंबई : महानगरपालिकेच्या मालमत्ता आणि पाणीपुरवठा विभागात देयके वटपासाठी कर्मचारी भरती झाली नसल्याने हा भार ठोक मानधनावरील लिपिक, कर्मचारी, व शिपाई यांच्यावर पडला आहे. ते ही देयके घेऊन वाटप करीत आहेत.
नवी मुंबई श्रीमंत महापालिका आहे. असे असले तरी देयके वाटपासाठी स्वतंत्र कर्मचारी नाहीत. त्यामुळे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना हे काम करावे लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेचे कायम कर्मचारी हे आमचे काम नाही सांगत आहेत.
कर्मचारी ठोक मानधनावरील असो की कायम, सर्वाची कामे एकच आहेत. असे असताना हे काम फक्त आम्हालाच का करावे लागते, असा प्रश्न एका लिपिकाने केला आहे.
नवी मुंबईत सुमारे सव्वातीन लाख मालमत्ता असून त्या द्वारे ५६२ कोटींचा कर मिळतो. ३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही देयके एका महिन्यात देणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक विभाग कार्यालयात १२ ते १५ ठोक मानधनावरील कर्मचारी हे काम करीत आहेत. शंभरपेक्षा कमी कर्मचाऱ्यांना सव्वातीन लाख देयके वाटप करावी लागत आहेत.
कर देयके देण्याचे काम लिपिकांना दिले जात नाही. नोटीस वैगरे महत्त्वाचे काही असेल तरच लिपिक जातात. मालमत्ता देयके देण्यासाठी जर लिपिकांना पाठवले जात असेल तर त्याबाबत माहिती घेऊन योग्य ती पावले उचलली जातील. -सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, महापालिका