नवी मुंबई : कोपरखैरणेतील एका घरफोडी गुन्ह्याचा तपास करीत असताना एका सराईत चोरटय़ास अटक करण्यात आली आहे. हा आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगून बाहेर आलेला असून त्याने त्यानंतर नऊ घरफोडी केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून १० लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद मोइनुल अब्दुल मलिक इस्लाम असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला यापूर्वी २०१८ मध्ये अटक करण्यात आले होते. २०१८ मध्ये चार गुन्ह्यांच्या नोंद त्याच्या नावावर होती. यातील एका गुन्हे प्रकरणात त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तो दोन वर्षांपूर्वी तो सुटला होता. त्यानंतर पुन्हा त्याने गुन्हेगारीचाच मार्ग अवलंबत घरफोडीचे गुन्हे करीत होता.
हा आरोपी एकटाच घरफोडी करत होता. सुमारे दोन फुटांची कटावणी तो जवळ बाळगत असे. रात्री फिरत असताना घर बंद दिसताच तो अवघ्या १० ते १५ मिनिटात चोरी करीत. कोपरखैरणे भागात घरोफोडी गुन्ह्यात वाढ होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी अभिलेखावरील, जामिनावर सुटलेले, शिक्षा
भोगून सुटलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवले होते. यात मोहम्मद याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने नऊ घरफोडी केल्याचा गुन्हा कबुल केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.