नवी मुंबई : समाज माध्यमाद्वारे नवी मुंबईतील एका व्यक्तीची व सीरियात राहणाऱ्या जेनी बार्टली या तरुणीशी ओळख झाली. तिनेही  भेट म्हणून १ लाख डॉलर पाठवले. हे पार्सल कस्टममधून सोडवून घेण्यासाठी व्यक्तीने तब्बल ९ लाख ४३ रुपये भरले. मात्र हाती काहीच न आल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यक्तीने पोलीस ठाणे गाठले व तरुणीविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत राहणाऱ्या सुखदेव शिंदे यांना २५ जानेवारीला समाज माध्यमातील त्यांच्या खात्यात सीरियात राहणाऱ्या जेनी बार्टली या युवतीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिचे प्रोफाइल पहिले असता ती यूएसए सैन्यात असून सध्या दमाकस सीरिया येथे असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शिंदे यांनी तिची रिक्वेस्ट स्वीकारत तिच्याशी मैत्री केली. मैत्री झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ जानेवारीला तिने मोबाईलवर १ लाख डॉलर पाठवत असल्याचा संदेश पाठवला होता. २७ जानेवारीला तुमचे पार्सल आले असून, कस्टम ड्युटी म्हणून ३८ हजार ५०० रुपये भरा, पार्सल दिलेल्या पत्त्यावर येईल, असा संदेश आला व त्यासोबत एक बँक खात्याचा क्रमांक आला. त्यामुळे शिंदे यांनी ३० जानेवारीला पैसे ऑनलाइन भरले आणि हा सिलसिला सुरू झाला.

हेही वाचा – पाणथळी, खारफुटी नष्ट झाल्यास उरणला पुराचा धोकाचा; भूजल उपलब्धतता आणि पाणी निचऱ्याचीही समस्या निर्माण होणार

हेही वाचा – नवी मुंबई : भाजी आणणे पडले महागात; काही वेळातच घरफोडी 

कधी कस्टम ड्युटी, कधी आयकर विभाग भरणा, तर कधी कस्टम सर्व्हिस चार्जेस अशा प्रकारे पैशांची मागणी सुरू झाली. त्यासाठी वेगवेगळे बँक  खाते क्रमांक देण्यात आले. २८ फ्रेब्रुवारीपर्यंत शिंदे यांनी ९ लाख ४३ हजार भरले. या दरम्यान तरुणी त्यांच्या संपर्कात होती. विशेष म्हणजे ती पार्सल मिळेल, असा दिलासाही देत होती. मात्र नंतर तिनेही संपर्क कमी केला. पैशांची मागणी संपत नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. त्यामुळे शिंदे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची सायबर विभागाने शहानिशा करीत जेनी बार्टलीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against young women from syria for fraud ssb
First published on: 27-03-2023 at 13:54 IST