नवी मुंबई : सीवूड्स सेक्टर ५० व कोपरखैरणे सेक्टर ११ येथे पालिकेने सुरू केलेल्या शाळांना नवी मुंबई शहरात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून यंदा नव्या शैक्षणिक वर्षांत वाशी व कोपरखैरणे येथे दोन सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता सारसोळे येथील पालिकेच्या शाळेतही सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नवीन वर्षांत तीन नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

सीबीएसई व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील वाशी व कोपरखैरणे येथे प्रत्येकी एक अशा २ सीबीएसई शाळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात आता नेरूळ विभागातील कुकशेत शाळेतही सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. नव्या तिन्ही सीबीएसई शाळा सीवूड्स येथील सीबीएसई शाळेप्रमाणे खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात येणार असून त्याबाबत शिक्षण विभागाने  निविदा मागवल्या होत्या. परंतु त्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने निविदा मागवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ १९ जुलैपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे १९ जुलैपर्यंत निविदांना प्रतिसाद येणार याकडे लक्ष असून दुसरीकडे नव्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक प्रतीक्षेत आहेत.

कुकशेत येथे नवी मुंबई महापालिकेची पहिली इंग्रजी शाळा २०१२ मध्ये सुरू करण्यात आली होती आता पालिका आयुक्तांनी सारसोळे येथील महापालिकेच्या शाळेत या शैक्षणिक वर्षांपासून सीबीएसई शाळा करण्याचा निर्णय घेतला असल्याने नेरुळ विभागातील गरीब मुलांना सीबीएसईचे शिक्षण घेता येणार आहे.

– सुरज पाटील, माजी नगरसेवक

सीबीएसई शाळा खासगी संस्थेकडून चालवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. वाशी व कोपरखैरणे बरोबरच सारसोळे येथील शाळेतही सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून मागवलेल्या निविदांमधून तीनही शाळा खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येणार आहेत. १९ जुलैपर्यंत निविदांसाठी मुदत आहे.

– जयदीप पवार, उपायुक्त, प्रशासन शिक्षण