सीसीटीव्ही यंत्रणा अपुरी; फळ बाजारात वाहनातील स्फोटानंतर सुरक्षा ऐरणीवर

नवी मुंबई : १७० एकरवर वसलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरक्षेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील होत आहे. चोरी, लूटमारी, बेकायदा धंदे तसेच अमली पदार्थ विक्रीचे ठिकाण बनलेल्या ‘एपीएमसी’त आता ज्वलनशील पदार्थाचे स्फोट होऊ लागल्याने येथील सुरक्षा ऐरणीवर आली आहे. सीसीटीव्ही सुरक्षेचे मोठे जाळे उभारण्याची गरज असतानाही या ठिकाणी अद्याप सक्षम अशी ही यंत्रणा उभी राहू शकली नसून तोकडय़ा सुरक्षारक्षकांच्या जिवावर येथील सुरक्षा अवलंबून आहे.

बाजारात ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला त्या परिसरातही एकही सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले असून हा कट घडेपर्यंत हा प्रकार कोणाच्याही लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ असून ती १७० एकरवर वसलेली आहे. या बाजारात दररोज जवळपास ६ हजार वाहने कृषी माल घेऊन राज्य व परराज्यातून येत असतात. पाच बाजार आवार असून या ठिकाणी ३७०० गोदामे, १५०० व्यावसायिक गाळे, ४ मोठे लिलाव गृह आहेत. त्यामुळे या ठिकाणीची सुरक्षाव्यवस्थाही महत्त्वपूर्ण आहे. मात्र वारंवार येथील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले असतानाही अद्याप सुरक्षाव्यवस्थेला बळकटी मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.

प्रत्येक बाजार आवारात काही सुरक्षारक्षक तसेच व्यापारी असोसिएशनच्या वतीने बसविण्यात आलेले सीसीटीव्ही आहेत तसेच एपीएमसी प्रशासनाकडूनही काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी खासदार निधीतूनही काही सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र बहुतांश सीसीटीव्ही बंद आहेत तर अनेक ठिकाणी सीसीटीव्हीच नाहीत अशी गंभीर परिस्थिती आहे. एकटय़ा फळबाजारातील सीसीटीव्हीच्या मिळालेल्या माहितीनुसार ६२ सीसीटीव्हींपैकी २१ कॅमेरे बंद आहेत. हीच स्थिती संपूर्ण बाजार आवारात आहे. तर भाजीपाला बाजारात ५६ सीसीटीव्ही आहेत, मात्र त्यातील किती सुरू आहेत याबाबत प्रशासन सांगू शकले नाही.

येथील फळ बाजारात शुक्रवारी घडलेली ज्वलनशील पदार्थाच्या स्फोटाची घटना तर अधिकच गंभीर आहे. हा प्रकार वैयक्तिक वादातून घडल्याचे समोर येत आहे. वादातून वाहनात स्फोट घडवून आणला असून एकाला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र स्फोट घडलेल्या ठिकाणी एकही सिसीटीव्ही नसल्याने त्याचे चित्रीकरण मिळू शकले नाही. तसेच ही घटना घडेपर्यंत कोणालाही याचा सुगावा लागला नाही, हे अधिक धोकादायक आहे.

काही वर्षांपूर्वी मसाला बाजाराच्या आवाराबाहेरील गटारात एका अज्ञात मृत इसमाचा हाडांचा सांगाडा निदर्शनास आला. चोरी, लूटमारी तसेच अमली पदार्थ विक्रीच्या वारंवार घटना एपीएमसी परिसरात घडत आहेत. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्था बळकट करण्याची मागणी होत आहे. विशेषत: या परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणे गरजेचे असूनसुरक्षा पथकाची नेमणूक करणेही गरजेचे असल्याचे आहे.

सुरक्षा व्यवस्था

भाजीपाला, फळ, कांदा बटाटा, मसाला आणि धान्य बाजारांपैकी भाजीपाला बाजारात ५६ तर फळ बाजारात ६३ सीसीटीव्ही आहेत. यामध्ये फळ बाजारातील २१ कॅमेरे बंद आहेत. या दोन्ही बाजारातीलल सीसीटीव्हीचे नियंत्रण बाजार आवारातच होत आहे. तर पाचही बाजारात एकूण ३१५ सुरक्षा रक्षक तैनात आहेत.

बाजारात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. मात्र काही सीसीटीव्ही बंद आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

-संगीता अढांगळे, उपसचिव, फळ बाजार समिती