एपीएमसी पोलीस ठाणे क्षेत्रात सीसी टीव्हींचा प्रभावी वापर

एक हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात साठ बँका व तेवढय़ाच पतपेढय़ांचा समावेश आहे.

गुन्हेगारीत ५० टक्के घट
मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला तरी मोक्याच्या ठिकाणी सीसी टीव्ही बसविण्याचे सरकारचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. याउलट नवी मुंबईत सीसी टीव्हीसंदर्भात चांगल्या प्रकारे जनजागृती झाली असून आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसीत आजच्या घडीला स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रयत्नामुळे एक हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात साठ बँका व तेवढय़ाच पतपेढय़ांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ मोठय़ा धार्मिक स्थळांपुरती मर्यादित असलेली सीसी टीव्ही नजर या क्षेत्रातील दोन धार्मिक स्थळांनी लावून त्याची अंमलबजावणी केली आहे
आठ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत विविध आठ ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर मुंबई शहरभर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी गृहविभागाने लंडनचा दौरा करून उच्च क्षमतेच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची पाहणीदेखील केली आहे, पण हे कॅमेरे लावण्याचे काम अद्याप कागदावर असून त्याची संपूर्ण शहरात प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. याच वेळी नवी मुंबई पालिकेने सहा कोटी रुपये खर्च करून शहरात मोक्याच्या ठिकाणी २६८ सीसी टीव्ही कॅमेरे बसविले असून त्यांची जोडणी थेट पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे. त्यामुळे शहरात घरफोडी, सोनसाखळी, खून यांसारखे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत झाली आहे. हाच धागा पकडून दोन वर्षांपूर्वी एपीएमसीसारख्या गजबजलेल्या पोलीस ठाण्याचा स्वतंत्र पदभार सांभाळणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी एपीएमसी पोलीस ठाणे सीसी टीव्हीमय करण्याचा निश्चय बांधला असून त्याला चांगले यश आले आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या एपीएमसीतील कांदा, बटाटा, भाजी, फळ, धान्य आणि मसाला बाजारातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात आणि दुकानासमोर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची जोडणी लावली आहे. यात प्रत्येक बँक व पतपेढी यांना सीसी टीव्ही सक्तीच्या करण्यात आलेल्या आहेत. या खासगी संस्थाबरोबरच एपीएमसी प्रशासनानेही पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर सीसी टीव्ही लावली आहे. त्यामुळे एपीएमसी पोलीस ठाणे परिसरात सद्य:स्थितीत एक हजारपेक्षा जास्त सीसी टीव्ही लावले गेले आहेत. लंडन, सिंगापूर, दुबई यांसारखी प्रगत शहरे आज सीसी टीव्हीच्या संपूर्ण देखरेखेखाली आहेत. राज्यात एपीएमसी पोलीस ठाणे असे एकमेव पोलीस ठाणे असे आहे, की ज्या क्षेत्रात इतक्या मोठय़ा प्रमाणात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्यात आल्याने येथील बारीक गुन्हय़ावरदेखील पोलिसांची नजर आहे. याचा फायदा गुन्हेगारीला आळा बसण्यास झाला असून गतवर्षी तीन प्रकारांतील ८८ गुन्हय़ांची संख्या थेट ५०(४४) टक्क्य़ाने कमी आली आहे. या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे थेट होणाऱ्या गुन्हय़ात तर घट झालीच आहे, पण याशिवाय अमली पदार्थ, जुगार यांसारख्या अड्डय़ांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

क्षेत्रात सोनसाखळी चोरीची एकही घटना झालेली नाही. व्यापारी, बँका, पतपेढी यांनी जास्त सीसी टीव्ही लावावेत यासाठी आग्रही आहोत. कॅमेऱ्यांचे अँगल्स पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या हालचालीदेखील टिपता येणे शक्य झाले आहे.
– माया मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cctvs effective use in apmc police station area