नवी मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी, ४ ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-वाशी हार्बर मार्गासह मुख्य मार्गावरील सीएसएमटी-विखरोळी दरम्यानच्या धीम्या मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने नवी मुंबईतील प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे लागणार आहे.

पनवेल-वाशी दरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेतील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच सीएसएमटीहून बेलापूर-पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेतील लोकलही रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरही सेवांवर परिणाम होणार आहे. पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेतील, तर ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेतील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. मात्र, ब्लॉकच्या कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा सुरू राहणार आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी-मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच पोर्ट मार्गावरील लोकल सेवा नियमित सुरू राहतील.

मुख्य मार्गावर सीएसएमटी-विखरोळी दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकलना भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबे देण्यात येतील. विखरोळी येथे त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

घाटकोपरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेतील धीम्या लोकलही विखरोळी ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकलना कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबे असतील. देखभाल व पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले असून प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.