|| शेखर हंप्रस
खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली खडी विखरून अपघातांची शक्यता

नवी मुंबई : ‘एमआयडीसी’तील महत्त्वाचा भाग असलेल्या महापे आणि पावणे येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मुळात रस्त्यांची कामे होत नाहीत. त्यात वांरवार खोदकामे होत असल्याने रस्ते चिखलमय झाले आहेत. तर प्रचंड मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यांवरून खडतर प्रवास सुरू आहे. विदेशातील एखादे शिष्टमंडळ कंपनीला भेट देण्यास येते तेव्हा त्यांना अशा रस्त्यातून घेऊन जाताना लाज वाटते अशी खंत उद्योजक व्यक्त करीत आहेत.

महापेची ओळख आयटी हब म्हणून आहे तर पावणे येथे अनेक रासायनिक कारखाने आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापे-पावणे हा पट्टा रासायनिक, इलेक्ट्रॉनिक कारखान्यांबरोबरच आयटी केंद्र म्हणूनही झपाट्याने विकसित झाला आहे. मात्र सुप्रसिद्ध मिलेनियम बिझनेस पार्कच्या प्रवेशद्वारावरच एक तासाच्या पावसानेही खूप पाणी साचते. याचे प्रमुख कारण नियोजनशून्य पद्धतीने झालेले रस्ते बांधणी, असा दावा अनेक उद्योजक करीत आहेत.

नवी मुंबई शहर बाळसे धरत असताना आयटी अर्थात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे क्षेत्र बहरात आले. त्याच दरम्यान एमआयडीसीतील काही मोठ्या रासायनिक कंपन्यांना घरघर लागली. नवी आव्हाने नवी क्षितिजे उद्योजकांना दिसत असताना महापे येथे मिलेनियम बिझनेस पार्क (एमबीपी) उभे राहिले. या ठिकाणी आयटी उद्योजकांनी अनेक कंपन्या उभ्या केल्या. त्यात जगातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक असलेला रिलायन्स उद्योग समूहाचे मुख्यालय आणि मोबाइल कंपनीसह अन्य कंपन्या उभ्या राहिल्या. हे सर्व महापे-खैरणे-पावणे एमआयडीसी परिसरात उज्ज्वल भविष्य दाखवणारे चित्र उभे राहिले. मात्र दुसरीकडे पायाभूत सुविधा कधीच पूर्ण क्षमतेने उभ्या राहिल्या नाहीत. अवघा एक-दीड तास पाऊस झाला तर एमबीपीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच गुडघाभर पाणी साठते. तर सेवा रस्ताही या ठिकाणी तयार करण्यात आला नाही. या भागातील रस्ता हा नवी मुंबई महापालिकेने बनवला आहे. त्याने रस्त्यांच्या ढिसाळ नियोजन केवळ एमआयडीसीच करत नसून नवी मुंबई महापालिकाही यात मागे नाही असा दावा येथील उद्योजक करीत आहेत.  अंतर्गत रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यातल्या त्यात पावणे व खैरणे भागातील रस्ते बरे आहेत. मात्र महापे भागातील मिलेनियम बिझनेस पार्क आणि परिसरातील रस्त्यांची दैना उडाली आहे. या भागात ट्रक-डंपरसारखी वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे तिथे चारचाकी, दुचाकींचा प्रवास तर खडतर झाला आहे.

सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करून भूमिगत वाहिन्या टाकल्या जात आहेत. मात्र त्यावर पक्का रस्ता करण्यात येत नाही. हीच अवस्था हायवा कंपनी रस्त्याची आहे, एक ते दीड फुटांपर्यंत येथे खड्डे पडलेले आहेत. चीन, जपान, युरोपातील आय टी कंपन्यांशी स्पर्धा करत देशाचे नाव मोठे करणारा आयटीहब येथून हाकेच्या अंतरावर आहे. विदेशातील एखादे

शिष्टमंडळ कंपनीला भेट देण्यास येते तेव्हा त्यांना अशा रस्त्यातून घेऊन जाताना लाज वाटते, अशी खंत या ठिकाणी काम करणाऱ्या व्ही के कृष्णन या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

मूळ गावठाणांनाही फटका

या नियोजनशून्यतेचा फटका येथील मूळ गावठाणांना बसला आहे. आजमितीस महापे, खैरणे, पावणे येथील ग्रामस्थ व्यथित झाले आहेत. एमआयडीसी आल्यावर आमचाही विकास होईल. नौकरीचे चिंता नाही असे वाटले मात्र तसे झाले नाही त्यात आता येथील पायाभूत सुविधा उभ्या करत असताना गावठाण भागाचा विचारच केला जात नाही. महापे गाव तिन्ही बाजूंनी रस्त्यांनी वेढले गेले आहे. मात्र हे करत असताना पूर्ण गावाची जमीन स्तर रस्त्यापेक्षा कमी उंचीचा झाल्याने व रस्त्यांना योग्य उतार न दिल्याने पावसात पूर्ण गावात पूर परिस्थिती असते असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

प्रकल्पग्रस्तांसाठी जे भूखंड देण्यात येतात त्याचे काहीही नियोजन नाही. रस्त्याच्या अगदी कडेपर्यंत जागा दिली जात असल्याने वापरली जाते. एमबीपी गेटसमोर साठणारे पाणी, रस्त्यापासून कल्व्हर्टची सदोष उंची, आशा साध्या चुका केल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साठून खड्डे पडतात. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात अशाच खड्ड्यात पडलेल्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने दोन मुले दगावली होती. रस्ता आहे पण गटारे नाहीत. पूर्वी येथे पाणी साचत नव्हते, असे येथील माजी नगरसेवक व ग्रामस्थ चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दुचाकी अपघातामुळे तरुणाला दुखापत

रस्त्यावरील खड्डे पाऊस नसताना चुकवता येतात, पण पावसात खड्ड्यात पाणी भरल्याने कळत नाही. अचानक गाडी खड्ड्यात गेली की जबर हिसका पाठीच्या माणक्यांना बसतो. हा अनुभव मलाही आला आहे. याचं खड्ड्यामुळे मी अनेक महिने स्पाँडीलीसेसने त्रस्त होतो. आता तर दुचाकी चालवायचीच नाही असा सल्ला डॉक्टरने दिला आहे, असा अनुभव अन्सार शेख या युवकाने सांगितला.

एमआयडीसीची निविदा तर पालिकेचे कार्यादेश

महापे-पावणे भागात अंदाजे ४५ किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आहेत. महापे भागातील सुमारे ३० किलोमीटर रस्त्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे. या एकूण रस्त्यांपैकी १५ किलोमीटर एमआयडीसी तर १५ किलोमीटर रस्त्यांचे काम नवी मुंबई महानगरपालिका करणार आहे. एमआयडीसीची निविदा प्रक्रिया सुरू असून मनपाची कामाचे आदेश काढण्यात आली आहे.

महापेतील रस्ते सर्वात जास्त खराब असून या ठिकाणी अपघातांचे प्रमाण मोठे आहे. इतक्या वर्षांत पक्के रस्ते देऊ  शकले नाहीत याची खंत प्रशासनाला वाटत नाही. मात्र उद्योजकांना फटका बसतो. -श्रीनिवासन, सीईओ, टीटीसी असोसिएशन

नवी मुंबई मनपा येथे रस्त्यांचे काम करीत असून अर्धा भाग एमआयडीसी बांधणार आहे. लवकरात लवकर हे रस्ते बनवले जाणार असून रस्ते सिमेंट काँक्रीटचे असल्याने आता हा प्रश्न कायम मिटेल. -एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

आम्ही बांधलेल्या  रस्त्यांवर पाणी साठत नाही. पावणेतील बहुतांश रस्ते झालेले असून महापेतील रस्त्यांचेकाम सुरू झाले आहे. एमआयडीसीचेही काम लवकरच सुरू होणार आहे.b– संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका