लोकसत्ता प्रतिनिधी नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिने उलटल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासन जागे झाले असून सोमवारपासून या शासन नियमाची अंमलबजावणी करत महापालिका शाळांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत. दरम्यान, नवी मुंबईतील खासगी शाळा तसेच पालिका चालवत असलेल्या सीबीएसई शाळांबाबत मात्र महापालिकेने कोणतेही परिपत्रक काढले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ८ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजल्यानंतर भरवण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेच्या ५० पेक्षा अधिक शाळा असून ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. पालिकेच्या शाळा सकाळ सत्र, दुपार सत्र, व सर्वसाधारण सत्र अशा तीन सत्रांत शाळा भरविण्यात येणार आहेत. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या माध्यमिक शाळांची वेळ सकाळी ६.५० ते १२.२५ वाजेपर्यंत ही वेळ ठरवण्यात आली असून दुपारच्या सत्रातील शाळांची वेळ दुपारी १२.३५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल. आणखी वाचा-नवी मुंबईतही मालमत्ता करमाफी! शहरातील पाचशे चौरस फुटांपर्यंतची घरे असणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा सर्वसाधारण सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ ही सकाळी १०.५० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंतची असेल. तसेच पूर्व प्राथमिक विभागाची शाळा ही सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ पर्यंतच्या वेळेत भरणार आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या काही माध्यमिक शाळा सर्वसाधारण वेळेत भरवण्याची गरज नसताना त्या विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेत यावे लागणार असून खासगी तासिकांच्या वेळापत्रकांमुळे विद्यार्थ्यांचा खोळंबा होणार आहे. प्राथमिक व पूर्वप्रथमिक विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेत शाळा नको म्हणून शाळांच्या वेळात समोवारपासून बदल करण्यात येत आहे. पालिका सीबीएसई शाळांचे नियम दिल्ली बोर्डानुसार असून या शाळांबाबत सीबीएसई बोर्डाच्या नियमानुसार शाळांच्या वेळा आहेत. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सकाळच्या सत्रातच शाळेत येतील असे नियोजन आहे. -संघरत्ना खिल्लारे, उपायुक्त, शिक्षण विभाग, नमुंमपा